BMC Election 2026 Voting : विरोधी पक्षांकडून सातत्याने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक गंभीर आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. मुंबईत आज सकाळी मतदान करून बाहेर पडलेल्या काही मतदारांच्या बोटांवरील शाई पुसली जात असल्याचे निदर्शनास आले असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटांवर पारंपरिक अमिट शाईऐवजी मार्करद्वारे खूण करण्यात येत आहे. मात्र, या मार्करने लावलेली खूण सहजपणे पुसली जात असल्याचे काही मतदारांच्या लक्षात आले. यामुळे मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, बोटावर केलेल्या मार्करच्या खुणांपैकी नखांवरील शाई सहज निघून जात असल्याची बाब बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनीही मान्य केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेतील काही बाबींमुळे निर्माण झालेल्या वादात आता माध्यमविश्वातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नवाकाळ वृत्तपत्राच्या सर्वेसर्वा जयश्री खाडिलकर यांनी स्वतःचा अनुभव मांडत या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर आणली आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे मतदानानंतर बोटावर लावण्यात आलेली शाई अत्यंत अल्प वेळात पुसली गेल्याचा अनुभव स्पष्टपणे नमूद केला आहे.
नवाकाळच्या सर्वेसर्वा जयश्री खाडिलकरजयश्री खाडिलकर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, मतदान करून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच बोटावरील शाई जवळजवळ पूर्णपणे निघून गेली. मतदानाची ओळख म्हणून वापरण्यात येणारी शाई इतक्या सहजपणे मिटणे ही बाब गंभीर असून, त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत आणि विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण होतात, असे त्यांनी सूचित केले आहे.

यंदाच्या निवडणुकीत पारंपरिक अमिट शाईऐवजी मार्करचा वापर करण्यात येत असल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवत असल्याचा आरोप अनेक स्तरांतून केला जात आहे. मतदानानंतर मतदाराने पुन्हा मतदान करू नये, यासाठी बोटावर लावली जाणारी खूण ही अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, ती खूणच सहज नष्ट होत असल्यास निवडणूक प्रक्रियेच्या मूलभूत तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिक ठरते.
जयश्री खाडिलकर यांनी मांडलेला अनुभव हा वैयक्तिक असला, तरी तो संपूर्ण प्रक्रियेतील संभाव्य त्रुटीकडे लक्ष वेधणारा आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने खुलासा करावा, तसेच भविष्यात अशा बाबी टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकशाहीच्या पायाभूत स्तंभांपैकी असलेल्या निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते.
हा प्रकार केवळ मुंबईपुरताच मर्यादित नसून, कोल्हापूर येथील कर्मवीर इंग्लिश मिडियम स्कूलमधील मतदान केंद्रावरही काही मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या साधनांच्या गुणवत्तेबाबत आणि संपूर्ण यंत्रणेच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा शंका निर्माण झाल्या आहेत.
लोकशाही व्यवस्थेतील निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत विश्वासार्ह, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त असणे अपेक्षित असते. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे निवडणूक यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य निवडणूक आयोगाकडून यंदाच्या मतदान प्रक्रियेसाठी पारंपरिक अमिट शाईऐवजी विशेष मार्कर किट उपलब्ध करून देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, हा मार्कर सन २०१२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरात असून, त्याचा वापर नियमबाह्य नसल्याचे आयोगाने सांगितले आहे. मात्र, अलीकडील काही घटनांमुळे आणि निर्णयांमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निवडणूक प्रक्रियेच्या ऐन तोंडावर आयोगाने घेतलेले काही निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, त्यात प्रामुख्याने नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या निर्णयांचा उल्लेख केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ‘प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट’ अर्थात PADU नावाचे नवीन यंत्र सादर केले आहे. मुंबईतील काही निवडक वॉर्डांमध्ये ईव्हीएम यंत्रणेला बॅकअप म्हणून हे PADU मशीन वापरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, या यंत्राबाबत निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी माहिती दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे.
Maharashtra Elections २०२६ : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत किती टक्के मतदान झाले?
१. आजच्या महापालिका आणि सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी ०९: ३० वाजेपर्यंत काही महत्वाचे मतदानाचे आकडे समोर आले आहेत.
२. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सकाळी ०९:३० पर्यंत ६.९८% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
३. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी ७ ते ८ या एका तासात अंदाजे ७ ते ८% मतदान झाले आहे.
४. तर पुण्यातील पहिल्या दोन तासांत फक्त ५.५% मतदान नोंदले गेले आहे.
५. सोलापूरमध्ये सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी ६.८६% झाली आहे.
६. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी ६.४५% इतकी आहे.
७. परभणी शहर महानगरपालिकेसाठी सकाळच्या दोन तासांमध्ये ०९:१० % एवढं मतदान…
८. मालेगाव महापालिका निवडणुकीत सकाळी ०९:३० वाजेपर्यंत ११. ०९ टक्के मतदान…
१०. अमरावती महानगरपालिका निवडणूक – सकाळी ०७:३० ते ०९:३० वाजेपर्यंत ६.६ टक्के मतदान..
हे देखील वाचा – Aadhaar Card : आता एका क्लिकवर व्हॉट्सॲपवर मिळवा ‘आधार कार्ड’! जाणून घ्या सोपी पद्धत









