Home / महाराष्ट्र / BMC Election 2026 Voting : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, सरासरी ४४ टक्के मतदानाची नोंद

BMC Election 2026 Voting : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, सरासरी ४४ टक्के मतदानाची नोंद

BMC Election 2026 Voting : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून या निवडणुकीत राज्यभर सरासरी सुमारे ४४...

By: Team Navakal
BMC Election 2026 Voting
Social + WhatsApp CTA

BMC Election 2026 Voting : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून या निवडणुकीत राज्यभर सरासरी सुमारे ४४ टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली असली, तरी काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, या सर्व महानगरपालिकांची मतमोजणी उद्या सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून, सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात येईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाणार आहे.

मतदानाच्या टक्केवारीकडे पाहता, मुंबईत ४६ टक्के, नवी मुंबईत ४९ टक्के, पुण्यात ४३ टक्के, ठाण्यात ४५ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४४ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. कोल्हापूरमध्ये ५४ टक्के आणि इचलकरंजीमध्ये ५० टक्के मतदान झाल्याने या भागांत मतदारांचा सहभाग तुलनेने अधिक असल्याचे दिसून आले. नागपूरमध्ये ४१ टक्के, सोलापूरमध्ये ४४ टक्के, अकोल्यात ४७ टक्के, तर धुळ्यात ४० टक्के मतदान झाले आहे.

मराठवाड्यातील काही शहरांमध्ये मतदानाचा टक्का समाधानकारक राहिला. परभणीत ५३ टक्के, जालन्यात ४९ टक्के, नांदेडमध्ये ४५ टक्के आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र केवळ ३४ टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अहिल्यानगरमध्ये ५२ टक्के मतदानाची नोंद झाली असून, नाशिकमध्ये ४५ टक्के आणि जळगावमध्ये ३८ टक्के मतदान झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात संमिश्र चित्र पाहायला मिळाले. सांगलीमध्ये ४५ टक्के, वसई-विरारमध्ये ५० टक्के, कल्याण-डोंबिवलीमध्ये केवळ ३३ टक्के, उल्हासनगरमध्ये ४९ टक्के आणि भिवंडीमध्ये ४२ टक्के मतदान झाले आहे. चंद्रपूरमध्ये ४१ टक्के, मीरा-भाईंदरमध्ये ४१ टक्के, पनवेलमध्ये ३५ टक्के, तर अमरावतीमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे ३० टक्के मतदान नोंदवले गेले आहे.

एकूणच, काही शहरांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून आला असला, तरी अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का अपेक्षेप्रमाणे न वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, कोणत्या महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रशासनाने मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण केल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या