Kalyan Dombivli : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपने क्लीन स्वीप केला आहे. या प्रभागातील चारही जागांवर भाजपच्या कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, अलका म्हात्रे आणि मंदार टावरे यांनी विजय मिळवला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार तरंजना पाटील, रुपाली म्हात्रे तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेले नितीन पाटील आणि रवी पाटील यांचा पराभव झाला आहे.
दरम्यान, पराभूत उमेदवार रवी पाटील, नितीन पाटील यांच्या पत्नींसह उमेदवार रुपाली व तरंजना पाटील यांनी ईव्हीएम मशिनमध्ये घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रत्येक उमेदवाराला जवळपास समान मते मिळाल्याचे आकडे दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
डोंबिवलीतील वॉर्ड क्रमांक २९ मध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असली तरी प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले. या वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले होते, ज्यामुळे हा प्रभाग संपूर्ण निवडणूक काळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
प्रचारादरम्यान घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे वातावरण अधिक तापले होते. भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांच्या पती ओमनाथ नाटेकर यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मारहाणीच्या घटनेत ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले असून त्यांना डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलिस तपासात, ओमनाथ नाटेकर पैसे वाटत असल्याचा संशय रवी पाटील आणि नितीन पाटील यांना आला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी जाऊन मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये रवी पाटील आणि नितीन पाटील यांच्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
मारहाणीदरम्यान स्वतः जखमी झाल्याने नितीन पाटील आणि रवी पाटील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र पोलिसांनी रुग्णालयात जाऊन दोघांनाही ताब्यात घेतले. या अटकेनंतर तुकारामनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एकूणच, गंभीर आरोप, हिंसाचार, अटक आणि ईव्हीएम वाद यांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २९ मधील भाजपचा विजय राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.









