PMC Election: पुणे महापालिकेच्या रणधुमाळीत कसब्यातील लढत प्रतिष्ठेची बनली होती. मात्र, आज लागलेल्या निकालात आमदार रवींद्र धंगेकर यांना त्यांच्याच हद्दीत मतदारांनी नाकारल्याचे पाहायला मिळत आहे. या निकालाने धंगेकर कुटुंबाला दुहेरी दणका दिला असून, महायुतीने या भागात जोरदार कमबॅक केले आहे.
घरातच लागला पराभवाचा सुरुंग
रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांनी प्रभाग २४ मधून निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे कसब्यातील वजनदार नेते गणेश बिडकर मैदानात होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत बिडकर यांनी पहिल्या फेरीपासूनच आपली पकड मजबूत ठेवली. अखेर बिडकर यांनी प्रणव धंगेकरांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत आपला जुना वचपा काढला.
दुसरीकडे, प्रभाग २३ मधून रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर नशीब आजमावत होत्या. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार सोनाली आंदेकर यांचे आव्हान होते. या प्रभागातही मतदारांनी आंदेकरांच्या पारड्यात माप टाकल्याने प्रतिभा धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
गणेश बिडकर यांचे वर्चस्व आणि ‘महापौर’ पदाची चर्चा
या विजयामुळे गणेश बिडकर पुन्हा एकदा पुण्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतरही बिडकर यांनी कसब्यात आपले संपर्क जाळे टिकवून ठेवले होते. मतमोजणी सुरू असतानाच त्यांच्या समर्थकांनी त्यांना ‘पुण्याचे भावी महापौर’ म्हणून प्रोजेक्ट करणारे फ्लेक्स लावले होते. आता धंगेकरांच्या मुलाचा पराभव केल्याने बिडकर यांचा दावा अधिक प्रबळ झाला आहे.
कसब्यातील समीकरणे बदलली?
ज्या कसब्यातून रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा २८ वर्षांचा गड फोडला होता, त्याच कसब्यात त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना निवडून आणता आले नाही. स्थानिक राजकारणात आंदेकर फॅक्टर आणि भाजपची सूक्ष्म नियोजित रणनीती धंगेकर पॅटर्नवर भारी पडल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.









