Raj Thackeray : महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भावनिक पण पत्र लिहिले आहे. यात त्यांनी मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचे दु:ख व्यक्त करतानाच, खचून न जाता नव्या जोमाने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबई महापालिकेच्या निकालात महायुतीचा महापौर निश्चित झाला असून, मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मराठी माणसांसाठीची लढाई आता सुरू झाली आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी पुढील संघर्षाचे संकेत दिले आहेत.
सस्नेह जय महाराष्ट्र,
— Raj Thackeray (@RajThackeray) January 17, 2026
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम…
राज ठाकरे म्हणाले की, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळाले नसले याचे दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असे दिसले तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपले अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचे भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकले, काय राहून गेले, काय कमी पडले आणि काय करावे लागेल याचे विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरे तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभे रहायचे आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचे नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया.
मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील- अमित ठाकरे
राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीदेखील कालच्या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालावर एक्स पोस्टमधून भाष्य केले. अमित ठाकरे एक्स पोस्ट करत म्हणाले की, मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील। निकाल काहीही असो… खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं, ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटनापुरतं’ किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला… सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरूच राहील. खचून जाऊ नका… ‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच एकटं पडू देणार नाही… हा शब्द आहे ठाकरेंचा ! जय महाराष्ट्र.
मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील! 🚩 pic.twitter.com/VpJm53Xlo4
— Amit Thackeray (@amitrthackeray) January 17, 2026
विजयी उमेदवार शिवतीर्थावर
मुंबई आणि नवीमुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयी उमेदवारांनी आज शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी स्वतः शर्मिला ठाकरे यांनी विजयी नगरसेवकांचे औक्षण करून त्यांना तिळगूळ दिले. राज ठाकरे यांनी या नगरसेवकांबरोबर फोटो काढून घेतला.
काल विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आज विजयी मनसे नगरसेवकांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दादर गाठले. यावेळी मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वतः शर्मिला ठाकरे यांनी विजयी नगरसेवकांचे औक्षण करून त्यांना तिळगुळ दिले. तसेच राज ठाकरे यांनीही नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना आशीर्वाद दिले. लवकरच त्यांची पुन्हा भेट घेऊन त्यांना कानमंत्र देणार असल्याचे मनसेचे दादरचे विजयी नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. यावेळी मनसेचे नगरसेवक सुरेखा परब, विद्या आर्या, सई शिर्के, सुप्रिया दळवी, ज्योती राजभोज, हरी नाडर, यशवंत किल्लेदार आणि नवीमुंबईचे अभिजीत देसाई आदी नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे यांनी भाजपा व शिंदे गटाचा विजय पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की , सत्ताधारी महायुतीने कल्याण डोंबिवली येथील आमच्या दिसतील त्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना उचलून नेले. त्यानंतरही आमचे पाच उमेदवार तिथे निवडून आले. त्यांनी पैसे ओतले, माणसे चोरली, त्यानंतरही आम्ही नवी मुंबईत खाते उघडले. त्यामुळे मला अभिमान आहे. आमची अशीच घोडदौड सुरू राहील. , सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष एकमेकांवरच आरोप – प्रत्यारोप करत आहेत. भाजपने पहिल्यांदा अजित पवारांच्या फायली आम्ही अजून बंद केल्या नसल्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी त्यांनाही सोबत घेतले. लोकांनी डोळे उघडले पाहिजे. हे सत्ताधीश लोक निवडणुकीत एकमेकांविरोधात काय बोलत होते यावर लक्ष दिले पाहिजे. म्हणजे माझ्याकडे तुमच्याविरोधात पुरावे आहेत, पण मी सत्ता उपभोगतो तोपर्यंत मी ते देणार नाही असा हा प्रकार आहे.
शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या की, मी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे व आमच्या सर्वच नेत्यांचे अभिनंदन करेन. आमचे शून्य नगरसेवक होते. उबाठाचे त्यांनी 60-65 नगरसेवक पळवून नेले होते. त्यांच्याकडे केवळ 20 उरले होते. त्यानंतर आमचे आज 6 नगरसेवक निवडून आले, तर उबाठाचेही 65-66 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे आम्ही खूप चांगली लढत दिली आहे. सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवावे लागते. तेवढे धान्यच आम्ही पुरवले. याऊलट विरोधकांकडे मिसाईल्स असूनही चांगली लढत दिली.









