BJP National President : भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भाजपचे सध्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नबीन यांचा पक्षाचे नवे अध्यक्ष होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नबीन यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली जाणार आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक आणि प्रक्रिया
भाजपने दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी १९ जानेवारी रोजी नामांकरण अर्ज दाखल केले जातील. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २० जानेवारी रोजी नवीन अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात पार पडणार आहे.
रिपोर्टनुसार, नितीन नबीन यांच्यासाठी अर्जांचे ३ संच दाखल केले जातील. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह हे स्वतः या अर्जांचे सूचक असणार आहेत. २० जानेवारी रोजी पक्षाच्या मुख्यालयात एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, ज्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
जे. पी. नड्डा यांचा वारसदार
नितीन नबीन हे सध्याचे आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची जागा घेतील. भाजप अध्यक्षांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. नड्डा यांचा कार्यकाळ २०२३ मध्ये संपला होता, मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता त्यांना १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. पक्षाच्या नियमानुसार, राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यासाठी किमान ५० टक्के राज्यांच्या युनिट्सची स्थापना होणे आवश्यक होते, जी प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.
नितीन नबीन यांची निवड निश्चित?
लोकसभा निवडणुकीनंतर १४ डिसेंबर रोजी नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पक्षाच्या संसदीय मंडळानेही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. तेव्हापासूनच हे स्पष्ट झाले होते की, नबीन हेच अध्यक्षपदासाठीचे एकमेव उमेदवार असतील आणि त्यांची निवड ही केवळ औपचारिकता उरली आहे.









