Amravati Politics: अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. या निवडणुकीत भाजपला केवळ 25 जागांवर समाधान मानावे लागल्याने, पक्षातील एक मोठा गट आक्रमक झाला आहे.
भाजपच्या 22 पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून माजी खासदार नवनीत राणा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका आरोप काय?
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात पराभूत उमेदवारांनी नवनीत राणा यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते:
- विरोधी प्रचार: निवडणुकीच्या शेवटच्या 5 दिवसांत नवनीत राणा यांनी उघडपणे भाजपच्या विरोधात काम केले.
- डमी उमेदवार: भाजपचे उमेदवार ‘डमी’ असून पती रवी राणा यांच्या ‘युवा स्वाभिमान’चे उमेदवार हेच खरे भाजपचे उमेदवार आहेत, असा प्रचार राणा यांनी केल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे.
- भविष्यातील धोका: जर राणा यांच्यावर कारवाई केली नाही, तर त्या अमरावती शहरात भाजपचा पूर्णपणे नायनाट करतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
नवनीत राणा यांचे सडेतोड उत्तर
या आरोपांनंतर नवनीत राणा यांनी आपली बाजू मांडताना टीकाकारांचा समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या की, “मी कोणाला उत्तर देण्यासाठी नाही, तर भाजपसाठी काम करते. जे लोक टीका करत आहेत, ते माझ्या पाठीमागे बोलत आहेत. पाठीमागे कोणीही काहीही बोलू शकते. टीका करणाऱ्यांनी ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ असा सल्ला मी देईन.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जरी युवा स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लढला असला, तरी भाजपशी असलेली मैत्री आणि युती कायम आहे. अमरावतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आम्हाला गरज भासणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
“तिकीट वाटपात झाला घोळ”
नवनीत राणा यांनी भाजपच्या कमी जागा येण्याचे खापर तिकीट वाटपावर फोडले आहे. “अमरावतीत ज्या उमेदवारांना लोकांनी निवडायचे होते, त्यांनाच निवडून दिले आहे. भाजपमध्ये तिकीट वाटप करताना थोडा घोळ झाला होता. जर काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली असती, तर भाजपचे 50 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले असते,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. ही सर्व माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.









