Shinde sena – मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एण्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन दिवसांसाठी ठेवल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शिंदे यांनी भाजपाकडे अडीच अडीच वर्षे महापौर पद मागितले आहे. त्यासाठी ते ही खेळी करीत भाजपावर दबाव टाकत आहेत. विशेष म्हणजे पालिकेवर भाजपाचा महापौर नको म्हणून शिंदे यांच्या या दबावतंत्रात ठाकरे त्यांना साथ देत आहेत. शिंदेंचे नगरसेवक फोडून आम्हीच भाजपाला डावलत आमचा महापौर आणू, अशी हवा उद्धव ठाकरे ते संजय राऊत सर्वच तयार करीत आहेत. हे नाटक बरेच दिवस सुरू राहणार आहे.
शिंदे यांनी अडीच वर्षे महापौरपद मागितल्याचा भाजपाने जाहीर इन्कार केला असला तरी भाजपा आणि शिंदे यांच्यात कोणतीच चर्चा सुरू नसल्याने संभ्रम कायम आहे. दुसरीकडे शिंदे यांचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे वृत्त पेरून शिंदे आणि ठाकरे गटांनी भाजपाची धाकधूक वाढवली आहे. उबाठाचे संजय राऊत यांनी तर आज सकाळी पत्रकारांशी बोलताना आपण काही उबाठा नेत्यांसह ताज लँड्स एण्डलाच जेवायला जाणार असल्याचे सांगून सनसनाटी केली. त्यात ते आणखी असेही म्हणाले की, भाजपाचा महापौर बसू नये ही सर्वांचीच इच्छा आहे. तिकडेही आमचेच मूळ लोक आहेत, त्यांनाही तसेच वाटते आहे. त्यामुळे शिंदेंच्या नगरसेवकांचे हॉटेलात राहण्याचे गूढ उलगडण्याऐवजीआणखी वाढले.
मुंबई पालिका निवडणुकीत भाजपाने 89 जागांवर विजय मिळवला असला तरी महापौर बसविण्यासाठी त्यांना 114 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदे गटाच्या 24 नगरसेवकांची मदत अपरिहार्य आहे. हीच संधी साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपासमोर अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवला आहे. स्थायी समिती व इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशीही शिंदे यांची मागणी आहे. मात्र शिंदे यांनी जास्त दबाव आणल्यास भाजपा त्यांच्या नगरसेवकांची फोडाफोडी करू शकते, अशीही भीती आहे. त्यामुळेच शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना सुरक्षित ठेवले आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपावर आणलेल्या दबावाला खतपाणी घालण्यासाठी शिंदेंचे काही नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची बातमी पेरण्यात आली. शिंदे गटाच्या या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केला. आमच्या मनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी कोणतेही वैर नाही, असे या नगरसेवकांनी सांगितले. या गुप्त वाटाघाटींची कुणकुण लागताच उपमुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने आपल्या नगरसेवकांची रवानगी हॉटेलमध्ये केली असे वातावरण निर्माण केले. शिंदेंचे नगरसेवक ठाकरे गटाकडे गेले तर आपला महापौर बसणार नाही या विचाराने भाजपा अडीच वर्षांची अट मान्य करील आणि भाजपाचा महापौर न बसता शिंदे यांचा महापौर बसेल ही ठाकरेंची रणनीती असल्याचे बोलले जाते.
भाजपा नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे फेटाळत असे स्पष्ट केले की, शिंदे गटाकडून अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात शिंदे गटाकडून अशी मागणी आल्यास त्यावर चर्चा केली जाईल. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच ही चर्चा होईल. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी नगरसेवकांना हॉटेलवर ठेवण्यात आल्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली की, आमचे जवळपास 20 नगरसेवक हे नवखे आहेत, त्यांना मनपाचे कामकाज कसे चालते माहीत नाही. त्यामुळे आम्ही नगरसेवकांसाठी दोन दिवसीय शिबिर घेतले आहे. त्यासाठी हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत. हे उबाठाच्या नगरसेवकांना हरवून आले. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीचा हा विषय नाही. महापौरपदाचा निर्णय महायुतीचे नेते घेतील. मात्र राऊत सतत म्हणत आहेत की, भाजपाचा महापौर मुंबईत बसू द्यायचा नाही, यावर सर्वांचे एकमत आहे. नगरसेवक मूळचे शिवसेनेचेच असून, त्यांच्या मनात मराठी अस्मितेची ज्योत आजही धगधगत आहे. भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे जवळपास सर्व नगरसेवकांनी ठरवले आहे. या दबावतंत्राचा शेवट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून परतल्यावरच होईल.
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितले की, मुंबईचा महापौर निवडीवेळी कोण कोण नॉट रिचेबल राहतील हे तुम्हाला कळेल. आम्ही हॉटेलचे राजकारण कोणावरही दबाव आणण्यासाठी करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हॉटेलमध्ये सर्व नगरसेवकांना भेटायचे होते. त्यानुसार एकनाथ शिंदे नगरसेवकांची भेट घेऊन मार्गदर्शन करत आहेत. 2019मध्ये महायुती म्हणून निवडून यायचे आणि सत्ता काँग्रेससोबत स्थापन करायची. असे जे जुन्या शिवसेनेने ते केले, तसे आता घडणार नाही. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवली. महापौर महायुतीचा होणार आहे. पराभव झाल्यानंतर विरोधकांचा टाईमपास सुरू आहे. त्यातूनच ते अशी वक्तव्य करत आहेत.
एकनाथ शिंदेंचे मार्गदर्शन
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितले की, मुंबईचा महापौर निवडीवेळी कोण कोण नॉट रिचेबल राहतील हे तुम्हाला कळेल. आम्ही हॉटेलचे राजकारण कोणावरही दबाव आणण्यासाठी करत नाही. पराभव झाल्यानंतर विरोधकांचा टाईमपास सुरू आहे. त्यातूनच ते वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हॉटेलमध्ये सर्व नगरसेवकांना भेटायचे होते. त्यानुसार एकनाथ शिंदे नगरसेवकांची भेट घेऊन मार्गदर्शन करत आहेत. २०१९मध्ये महायुती म्हणून निवडून यायचे आणि सत्ता काँग्रेससोबत स्थापन करायची. जुन्या शिवसेनेने ते केले, तसे आता घडणार नाही. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवली. महापौर महायुतीचा होणार आहे.
——————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
समरजित घाटगे यांनी फेसबुकवरून तुतारी हटवली !भाजपात घरवापसीची केवळ औपचारिकता बाकी
१९७२ नंतर पुन्हा मानवी चांद्रमोहीम ६ फेब्रुवारीला यानाचे उड्डाण होणार









