Vasai Sea : वसईच्या खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहातून अचानक तयार झालेल्या विशाल गोलाकार रिंगणामुळे मच्छीमारांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर स्पष्टपणे दिसणारे हे रिंगण नेमके कशामुळे तयार झाले, याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आलेले नसल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दृश्य कायम असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ही घटना काही दिवसांपूर्वी वसईच्या पाचूबंदर येथून मासेमारीसाठी निघालेल्या ‘ॐ नमः शिवाय’ या मच्छीमार नौकेसोबत घडली. ही नौका कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची असून, मासेमारीदरम्यान समुद्रात जीपीएस क्रमांक २०-१५-५५४, ७१-५८-५७६ या ठिकाणी पाण्याचे मोठे रिंगण तयार झालेले मच्छीमारांच्या निदर्शनास आले. या रिंगणात बोट काही काळ अडकून पडल्याने नौकेवरील मच्छीमारांमध्ये घबराट पसरली होती. प्रसंगावधान राखत इंजिनाचा वेग वाढवून त्यांनी बोट त्या प्रवाहातून बाहेर काढली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
समुद्रात तयार झालेल्या या रिंगणाचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून, तो पाहणाऱ्यांमध्येही कुतूहलासह भीती निर्माण करत आहे. मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार, हे रिंगण गेल्या सुमारे आठवडाभरापासून त्या भागात दिसून येत असून, त्याची तीव्रता कमी झाल्याचे कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे समुद्रातील नैसर्गिक घडामोड की मानवनिर्मित कारण, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेची माहिती मिळताच मत्स्य विभागाने तातडीने दखल घेतली आहे. वसईतील मत्स्य परवाना अधिकारी विनोद लोहारे यांनी सांगितले की, संबंधित मच्छीमार नौकेकडून माहिती मिळताच त्वरित तटरक्षक दल व नौदलाला याबाबत कळविण्यात आले आहे. या प्रकाराची सविस्तर चौकशी सुरू असून, समुद्रातील प्रवाह, खोली आणि इतर तांत्रिक बाबींचा अभ्यास केला जात आहे. मच्छीमारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, या रहस्यमय रिंगणामुळे वसई परिसरातील मच्छीमारांनी काही काळ त्या भागात मासेमारी टाळण्याचा निर्णय घेतला असून, प्रशासनाकडून अधिकृत माहिती व मार्गदर्शनाची प्रतीक्षा केली जात आहे. या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईपर्यंत समुद्रातील ही अनाकलनीय घडामोड चर्चेचा विषय ठरली आहे.









