JioHotstar Hike: मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचे ओटीटी प्लॅटफॉर्म ‘जिओहॉटस्टार’ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या ‘सुपर’ आणि ‘प्रीमियम’ सबस्क्रिप्शन श्रेणींच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर २८ जानेवारी २०२६ पासून लागू होतील. एकीकडे किमती वाढत असतानाच, कंपनीने सर्व श्रेणींमध्ये ‘मासिक’ प्लॅन्सची सुविधा देऊन कमी कालावधीसाठी प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यांना दिलासाही दिला आहे.
किमती का वाढल्या?
कंपनीच्या मते, गेल्या वर्षभरात टीव्ही आणि एकापेक्षा जास्त उपकरणांवर कंटेंट पाहणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मोठ्या स्क्रीनवरील वाढता वापर पाहता ही दरवाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्यांचे ‘ऑटो-रिन्यूअल’ सुरू आहे, अशा जुन्या ग्राहकांना सध्याच्याच किमतीत सेवा मिळत राहील.
जिओहॉटस्टारचे जुने आणि नवीन दर
| श्रेणी | कालावधी | जुनी किंमत (₹) | नवीन किंमत (₹) |
| Mobile | मासिक | उपलब्ध नाही | 79 |
| Mobile | वार्षिक | 499 | 499 (बदल नाही) |
| Super | मासिक | उपलब्ध नाही | 149 |
| Super | वार्षिक | 899 | 1099 |
| Premium | मासिक | 299 | 299 (बदल नाही) |
| Premium | त्रैमासिक | 499 | 699 |
| Premium | वार्षिक | 1499 | 2199 |
महत्त्वाचे बदल
- प्रीमियम वार्षिक प्लॅन: या प्लॅनमध्ये सर्वात मोठी वाढ झाली असून किंमत १,४९९ रुपयांवरून थेट २,१९९ रुपये झाली आहे.
- हॉलिवूड कंटेंट: आता नवीन युजर्ससाठी हॉलिवूडचे चित्रपट केवळ सुपर आणि प्रीमियम श्रेणीत उपलब्ध असतील. मोबाईल युजर्सना यासाठी वेगळे ‘ॲड-ऑन’ घ्यावे लागेल.
- मासिक प्लॅन: मोबाईल युजर्ससाठी ७९ रुपयांचा स्वस्त मासिक प्लॅन सुरू करण्यात आला आहे.
जिओहॉटस्टारने गुगल प्ले स्टोअरवर १०० कोटींहून अधिक डाऊनलोड्सचा टप्पा पार केला असून सध्या भारतात त्यांचे ४५ कोटींहून अधिक सक्रिय युजर्स आहेत. प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी आणि दर्जेदार स्पोर्ट्स कंटेंट पुरवण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









