Home / महाराष्ट्र / Dr. Sangram Patil : माझी मुले लंडनमध्ये एकटी आहेत – मुंबई विमानतळावर रोखल्यानंतर डॉ. संग्राम पाटील यांचा आक्रोश

Dr. Sangram Patil : माझी मुले लंडनमध्ये एकटी आहेत – मुंबई विमानतळावर रोखल्यानंतर डॉ. संग्राम पाटील यांचा आक्रोश

Dr. Sangram Patil – मोदी सरकारला (Modi government)नडलेल्या व लंडनस्थित अनिवासी भारतीय, वैद्यकीय डॉक्टर, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते (social activist)...

By: Team Navakal
Dr Sangram Patil
Social + WhatsApp CTA

Dr. Sangram Patil – मोदी सरकारला (Modi government)नडलेल्या व लंडनस्थित अनिवासी भारतीय, वैद्यकीय डॉक्टर, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते (social activist) डॉ. संग्राम पाटील (Dr. Sangram Patil) यांना पुन्हा एकदा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चौकशीच्या नावाखाली रोखण्यात आले. यामुळे त्यांचे लंडनला जाणारे विमान चुकले असून, त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. माझी मुले लंडनमध्ये एकटी आहेत, माझा जॉब जाण्याची भीती आहे. एका फेसबुक पोस्टसाठी एवढी मोठी शिक्षा का ? असा भावनिक सवाल त्यांनी केला आहे.

कोरोना महामारीच्या (COVID-19 pandemic) काळात युट्यूब आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून देशविदेशातील नागरिकांना वैद्यकीय मार्गदर्शन देणारे डॉ. संग्राम पाटील हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ठाम समर्थक म्हणून ओळखले जातात. सकाळी ते पत्नीसमवेत इंडिगोच्या विमानाने लंडनला रवाना होणार होते. मात्र, सकाळी ८ वाजता विमानतळावर पोहोचताच इमिग्रेशन काउंटरवर त्यांना अडवण्यात आले. त्यांना विमानात चढण्यास मज्जाव करण्यात आला आणि या गोंधळात त्यांचे विमान सुटले.

डॉ. पाटील १० जानेवारी रोजी कुटुंबासह भारतात आले असताना त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी मुंबईतील ना.म.जोशी मार्ग (N.M. Joshi Marg Police Station) पोलीस ठाण्यात जवळपास १५ तास चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. त्या वेळी तपास अधिकाऱ्यांनी लूक आऊट सर्क्युलर (LOC) मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले होते. तसेच, १९ जानेवारी रोजी सकाळच्या विमानाने ब्रिटनला जाण्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली होती.मात्र, यावेळी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा विमानतळावर रोखण्यात आल्याने डॉ. पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाजपाच्या सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक निखिल श्यामराव भामरे (Nikhil Shyamrao Bhamre)यांनी डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. डॉ. पाटील यांनी फेसबुक व युट्यूबच्या माध्यमातून भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच समाजात द्वेष पसरवणारा मजकूर प्रसिद्ध केल्याचाही आरोप आहे.
या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी डॉ. पाटील यांच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर (LOC) जारी केला असून, त्याचाच आधार घेत त्यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मी पूर्ण सहकार्य केले , तरीही त्रास

चौकशीनंतर डॉ. संग्राम पाटील म्हणाले,मी आतापर्यंत झालेल्या सर्व चौकशांना पूर्ण सहकार्य केलं आहे. पहिल्यांदा १५ तास, दुसऱ्यांदा ८ तास मी पोलिसांसमोर बसलो. तरीही चौकशी पूर्ण होत नाही. पोलिसांनी स्वतः मला सांगितलं होतं की आता काही अडचण नाही, LOC रद्द होईल. पण लंडनला परत जाताना पुन्हा मला आणि माझ्या पत्नीला रोखण्यात आलं. माझी मुले लंडनमध्ये एकटी आहेत. माझा नोकरीचा प्रश्न आहे. एका फेसबुक पोस्टसाठी एवढी मोठी कारवाई योग्य आहे का?

समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया

या घटनेनंतर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नागरिकांनी “डॉक्टरांना सन्मान द्या, त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नका” अशी मागणी केली आहे. तर काहींनी “एकीकडे विश्वगुरूच्या गप्पा आणि दुसरीकडे आपल्याच देशातील डॉक्टरची अशी अडवणूक” असा सवाल उपस्थित केला आहे. डॉ. पाटील यांच्यावर ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोपही त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

डॉ. संग्राम पाटील कोण आहेत?

डॉ. संग्राम पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते ब्रिटनमध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत. ते लंडनमध्ये स्थायिक असून, भारतातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर सातत्याने भाष्य करतात. केंद्र व राज्य सरकारांच्या धोरणांवर तसेच स्वायत्त संस्थांच्या निर्णयांवर ते उघडपणे टीका करतात. समाजमाध्यमांवर त्यांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे.

कोरोना महामारीच्या अत्यंत भयावह काळात, जेव्हा सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि असुरक्षिततेचे वातावरण होते, त्या काळात डॉ. संग्राम पाटील यांनी युट्यूबच्या माध्यमातून दिलेले वैद्यकीय मार्गदर्शन विशेषतः उल्लेखनीय ठरले. परदेशात वास्तव्यास असतानाही त्यांनी भारतातील नागरिकांशी सातत्याने संवाद साधत, कोरोना विषाणूची लक्षणे, काळजी घेण्याच्या उपाययोजना, घरगुती उपचार, मानसिक आरोग्य सांभाळण्याचे मार्ग तसेच रुग्णांनी घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर माहिती दिली.

त्यांच्या व्हिडीओंमधून दिलेला सल्ला केवळ माहितीपुरता मर्यादित न राहता, अनेक रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधार ठरला. कोरोना संसर्ग झाल्यानंतर शरीर कसे सावरावे, ऑक्सिजन पातळी कशी तपासावी, कोणत्या वेळी रुग्णालयात जाणे आवश्यक आहे आणि भीती न बाळगता परिस्थितीला कसे सामोरे जावे, याबाबत त्यांनी दिलेले मार्गदर्शन लाखो लोकांपर्यंत पोहोचले.

विशेष म्हणजे, अफवा आणि अपप्रचाराच्या काळात त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य माहिती देण्यावर भर दिला. त्यामुळे अनेक नागरिकांचा संभ्रम दूर झाला आणि योग्य उपचारांच्या दिशेने त्यांना मार्गदर्शन मिळाले. याच कारणामुळे डॉ. संग्राम पाटील हे कोरोना काळात प्रसिद्ध झाले. मात्र, सत्ताधाऱ्यांवर टीका केल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई होत असल्याची चर्चा सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरू आहे.


हे देखील वाचा –

कॉ. गोविंद पानसरे हत्याकांडातील जामिनावर असलेला आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू

वसईच्या खोल समुद्रात रहस्यमय गोलाकार रिंगण, मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण

 महापौराचे ‘अनुसूचित जमाती’चे आरक्षण झालेतर मुंबईत उबाठाचा महापौर! गुरुवारी निर्णय

Web Title:
संबंधित बातम्या