Prashant Jagtap : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि आता काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत जगताप यांनी आपल्या विजयानंतर जुन्या पक्षातील नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
“आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याव्यतिरिक्त दोन्ही राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्याशी माझा संबंध उरणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
तडजोडीच्या राजकारणाला दिला छेद
वानवडी मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जगताप यांनी आपल्या पक्षांतराचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, “मी ज्या पक्षात २६ वर्षे ६ महिने राहिलो, तिथल्या स्थानिक नेत्यांची कुटिल कारस्थाने आणि सत्तेसाठी वरिष्ठ स्तरावर होणाऱ्या तडजोडींना मी कंटाळलो होतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढणार हे स्पष्ट झाल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना पायदळी तुडवल्या जात होत्या, म्हणूनच मी काँग्रेसमध्ये जाण्याचा धाडसी निर्णय घेतला.”
राजकीय निवृत्तीचे संकेत
काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि त्यांची तत्वे मला पटली आहेत, असे सांगताना जगताप यांनी भविष्याबाबतही महत्त्वाचे विधान केले. “काँग्रेसमध्ये माझी राजकीय घुसमट झाली, तर मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. अशा वेळी थेट राजकारणातून निवृत्ती घेईन आणि समाजकारणात स्वतःला झोकून देईन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. लोकशाहीत मतदारांच्या विचारांशी तडजोड केल्यास जनता मतदानातून आपला राग व्यक्त करते, हे या निकालाने दाखवून दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेस नेत्यांचे मानले आभार
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल जगताप यांनी त्यांचे आभार मानले. भाजपसोबत सत्तेसाठी हातमिळवणी न करण्याची काँग्रेसची भूमिका मला भावली, असेही ते म्हणाले.
प्रशांत जगताप यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. सत्तेच्या राजकारणात तत्वनिष्ठ राहण्याचा आपला प्रयत्न असेल आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांना सभागृहात प्रखर विरोध करणार असल्याचे जगताप यांनी जाहीर केले आहे.









