Swami Avimukteshwaranand : प्रयागराज येथील माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर गंगेत स्नान करण्यावरून स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि मेळा प्रशासन यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. पोलिसांनी स्नानासाठी जाण्यापासून रोखल्याचा आरोप करत स्वामीजींनी अन्न-पाण्याचा त्याग करून आंदोलन सुरू केले आहे.
या दरम्यान, मेळा प्रशासनाने त्यांना एक नोटीस बजावून ते ‘ज्योतिष पीठाचे शंकराचार्य’ ही पदवी कोणत्या आधारावर वापरत आहेत, असा सवाल विचारला आहे.
प्रशासनाचा दावा आणि सुप्रीम कोर्टाचा संदर्भ
प्रयागराज मेळा प्राधिकरणाचे उपाध्यक्ष दयानंद प्रसाद यांनी ही नोटीस बजावली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जोपर्यंत अपिलाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत ज्योतिष पीठाच्या शंकराचार्य पदी कोणाचेही अभिषेक केले जाऊ शकत नाही. असे असतानाही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आपल्या छावणीबाहेर ‘शंकराचार्य’ असा फलक लावणे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यावर 24 तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
स्वामीजींच्या समर्थकांचा पवित्रा
स्वामीजींच्या प्रसारमाध्यम प्रमुखांनी प्रशासनाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येण्यापूर्वीच स्वामीजींचा अभिषेक झाला होता.
मौनी अमावस्येच्या दिवशी स्वामीजी आपल्या पालखीतून शांततेत स्नानासाठी जात होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना पालखीतून उतरण्यास भाग पाडले. समर्थकांनी विरोध केला असता पोलिसांनी लाठीमार केला, ज्यामध्ये 15 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चेंगराचेंगरी टाळण्यासाठी कारवाई: मेळा अधिकारी
दुसरीकडे, मेळा अधिकारी ऋषीराज यांनी सांगितले की, स्वामीजींच्या समर्थकांनी बॅरिकेड्स तोडून थेट संगमाच्या मुख्य भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मुख्य स्नानाच्या दिवशी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला. मुख्य स्नानाच्या दिवशी कोणत्याही वाहनांना परवानगी नव्हती, तरीही नियम मोडले गेले. कोणत्याही साधू-संतांचा अपमान करण्याचा प्रशासनाचा हेतू नव्हता, तर भाविकांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय वळण
या वादाला आता राजकीय रंगही चढला आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली असून, स्वामीजींसोबत झालेल्या वागणुकीला लज्जास्पद म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मेळा प्रशासनाने माफी मागावी आणि प्रोटोकॉलनुसार स्नानाची व्यवस्था करावी, या मागणीवर स्वामी अविमुक्तेश्वरानंद अजूनही ठाम आहेत.









