Home / महाराष्ट्र / Hitendra Thakur- मतदार याद्यांचा गोंधळ नसता तर शतक पार केले असते ! हितेंद्र ठाकूरांचा दावा

Hitendra Thakur- मतदार याद्यांचा गोंधळ नसता तर शतक पार केले असते ! हितेंद्र ठाकूरांचा दावा

(विशेष मुलाखत- वेदिका मांगेला) Hitendra Thakur- वसई–विरार महानगरपालिका निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीने (बविआ) एकहाती सत्ता मिळवली...

By: Team Navakal
Hitendra Thakur
Social + WhatsApp CTA

(विशेष मुलाखत- वेदिका मांगेला)

Hitendra Thakur- वसई–विरार महानगरपालिका निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीने (बविआ) एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपाला रोखण्यात त्यांना यश आले. या निवडणुकीत बविआचे ७१ उमेदवार विजयी झाले असून भाजपचे ४३ उमेदवार निवडून आले आहेत, तर शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी झाला आहे . मात्र ईव्हीएम, मतदार याद्या आणि मतदान केंद्रांमधील गोंधळ नसता तर पक्षाला १०० हून अधिक जागा मिळाल्या असत्या, असा ठाम दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. या निकालानंतर हितेंद्र ठाकूर यांनी विजयाचे शिल्पकार कोण, बंडखोरीचा परिणाम, ऑपरेशन लोटस, विरोधी पक्षांची भूमिका आणि आगामी विकासकामांची दिशा यावर सविस्तर भूमिका मांडली.

या विजयाचे शिल्पकार कोण आहेत?

उत्तर – कार्यकर्ते जिंदाबाद. कार्यकर्ते रात्रंदिवस काम करतात आणि आम्ही निवडून येतो. कार्यकर्त्यांमुळेच मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. त्यांनी जिव्हापाड मेहनत घेतली. विधानसभेच्या निवडणुकीत थोडा फाजील आत्मविश्वास आम्हाला नडला, त्याचा फटका कार्यकर्त्यांना बसला. मात्र यावेळी कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत निवडून यायचेच, ही जिद्द ठेवली. खरे तर आमच्या शंभरपेक्षा जास्त जागा यायला हव्या होत्या. पण दुर्दैवाने ईव्हीएममधील घोळ, मतदार याद्यांतील त्रुटी आणि मतदान केंद्रांमधील गोंधळ याचा फटका बसला. चार-चार किलोमीटर अंतरावर मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती, ही साधी बाब नाही. बोळींचे मतदान केंद्र सोपाऱ्याला, तर सोपाऱ्याचे बोळींला देण्यात आले. असे घोळ झाले नसते, तर निश्चितच आमच्या जागा वाढल्या असत्या

तुमच्या अनेक नगरसेवकांनी बंडखोरी केली होती तर त्याचा काही परिणाम झाला का?

उत्तर – हो, बंडखोर घरी बसले. ज्यांनी बंडखोरी केलेली त्यांना त्यांची जागा लोकांनी दाखवली.

ह्या निवडणुकीमध्ये तुमच्याच घरातील तीन लोकांचा पराभव झाला ?

उत्तर- निवडणुकीत पराजय होणे ही सामान्य गोष्ट आहे. पराभव होतच असतो. मात्र कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली. कुठेतरी आमचा अंदाज चुकला आणि तो आम्ही मान्य करतो.

आता भाजपने ऑपरेशन लोटस करून तुमचे पंधरा नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि असे जर झालेच तर तुम्ही काय कराल?

उत्तर – याबाबत मला नाही माहिती. पण असे अजिबात होणार नाही.

तुमचा तुमच्या नगरसेवकांवर इतका विश्वास आहे ?

उत्तर – शंभर टक्के.

इतकी वर्षे वसई-विरार महापालिकेवर तुमची एकहाती सत्ता होती. मात्र यावेळी पहिल्यांदाच तुमच्यासमोर विरोधी पक्ष असणार आहे.

उत्तर- सगळ्याच ठिकाणी विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे. तसा इथेही आहे.

या महानगरपालिका निवडणुकीत तुमच्यासमोर खूप मोठी आव्हाने होती. फडणवीसांनी देखील सभा घेतलेली. तुमच्यावर खूप आरोप प्रत्यारोप झाले. तरी देखील बविआने एकहाती सत्ता मिळवली.

उत्तर –देशभरातील नेते प्रचारासाठी आले. नेते कमी पडले तेव्हा अभिनेतेही आले. केरळमधून अभिनेते आले, तसेच उत्तर प्रदेश आणि बिहारमधूनही नेते व अभिनेते आले. सगळेच आले. मात्र जिथे कार्यकर्ते खंबीर असतात, तिथे कुणाचे काही चालत नाही. कार्यकर्त्यांच्या बळावरच आमचे नगरसेवक निवडून आले आहेत.

वसईमध्ये भाजपाचा सुपडा साफ झाला आहे. तर तुम्ही वसईत भाजपाला कसे थांबवले ?

उत्तर – मी कधी विरोधकांवर बोलत नाही, त्याच्यावर मी कमेंट्स पण करत नाही.

आता तुमची पुढची रणनीती काय असणार आहे?

उत्तर- आम्ही जी काही लोकांना वचन दिले आहेत किंवा जी माझ्या कारकिर्दीमध्ये राज्य शासनाकडून काम एमएमआरडीए तून काम पास करून घेतले आहेत ते आधी पूर्ण करू. हायवेपासून गावापर्यंतचे रस्ते म्हणजेच विरार हायवे ते नालासोपारा, नालासोपारा ते निर्मळ, वसई ते वालीव फाटा, सातिवली फाटा ते वसई गाव, नायगाव ते वसई गाव याशिवाय रिंग रोड, पाच रेल्वे ओव्हरब्रिज आणि शहरातील कोंडी कमी करण्यासाठी सात महत्त्वाचे पूलही ही सगळी काम करून घेणार. त्याचबरोबर पाणीपुरवठ्यासाठी आम्ही सुसरी धरणासह खुलचा पाडा एक आणि खुलचा पाडा दोन या धरणांसाठी एकूण १६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आधी सहा एमएलडी म्हणजे साठ लाख लिटर पाणी मिळत होते, ते आता वाढून सुमारे ४२० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. या तीन धरणांमधून भविष्यात वसई-विरार शहराला पुरेसे पाणी मिळावे, या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत निधी भरून आम्ही पाण्याची दीर्घकालीन तरतूद करून ठेवली आहे. त्याचप्रमाणे खड्डेमुक्त रस्त्यांसाठी कॉंक्रीट रस्त्यांची कामेही मंजूर करून घेतली आहेत. कारण आज पाठदुखी, कंबरदुखी तर आहेच, पण धुळीमुळे दमा आणि श्वसनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे रस्ते लवकरात लवकर चांगले करण्यावर आमचा भर असेल.

पाणीवाटपाबाबत सहा वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत मोठा गोंधळ झाला आहे. २०२० मध्ये महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतर पाणीवाटप व्यवस्थेचा बोळवारा उडाला. तो आम्ही सुधारून पाणी समान पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवू. ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांना नवीन कनेक्शन देऊ. ते अधिकृत असो वा अनधिकृत आम्ही भेदभाव करणार नाही, कारण अनधिकृत घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचा त्यात दोष नसतो. ही सर्व कामे ८ जून २०२४ रोजी मंजूर झाली. ९ जून २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटी रुपयांचा धनादेश दिला आणि माझा मुलगा तसेच बविआचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना कामाचा शुभारंभ करण्यास सांगितले. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे २०२४ पासून निधी उपलब्ध असूनही आजतागायत टेंडर काढण्यात आलेले नाहीत. ते टेंडर आम्ही लवकरात लवकर काढू. यासोबतच अडीचशे कोटींच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कामही प्राधान्याने हाती घेतले जाईल. हे अडीचशे कोटी राज्य सरकार देणार आहे. पण जर ज्य शासनाकडून निधी कमी पडला तरी महानगरपालिका आवश्यक ते पैसे उभे करेल, पण हे हॉस्पिटल उभारणे आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.


हे देखील वाचा-

महापौरांना अधिकार नाहीत! मात्रमोठा मान !महापौर पदासाठी चढाओढ का ? सुनील प्रभूंनी उत्तर दिले

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या