Belasis Bridge : ताडदेव–नागपाडा परिसराला मुंबई सेंट्रल स्थानकाशी जोडणारा बेलासिस उड्डाणपूल अवघ्या १५ महिने आणि ६ दिवसांत पूर्ण झाला असून, हा पूल २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, निविदेतील अटींनुसार या पुलाच्या कामासाठी अजून चार महिन्यांची मुदत शिल्लक असतानाच हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन बेलासिस उड्डाणपूल धोकादायक घोषित झाल्यानंतर त्याच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने हाती घेतले होते. सप्टेंबर २०२४ मध्ये कामाचा कार्यादेश देण्यात आला, तर प्रत्यक्ष कामास १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात झाली. महापालिकेचा पूल विभाग आणि रेल्वे विभागाच्या अभियंत्यांनी समन्वय साधत पहिल्या दिवसापासून काम वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला.
या प्रकल्पासाठी कामाची काटेकोर विभागणी करण्यात आली होती. रेल्वे रुळांवरील कामे मध्य रेल्वेकडून, तर गर्डरचे मजबुतीकरण, पुलाचा स्लॅब, पृष्ठभागाची रचना तसेच दोन्ही बाजूंच्या पोहोच रस्त्यांची कामे महापालिकेकडून पूर्ण करण्यात आली.
बांधकामादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात बेस्ट बस मार्गांचे स्थलांतर, अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटवून पर्यायी घरे उपलब्ध करून देणे, एका गृहनिर्माण संस्थेची सीमाभिंत हटवणे, तसेच उच्च न्यायालयातील खटल्यांचा समावेश होता. मात्र या सर्व आव्हानांवर मात करत कामात कोणताही विलंब होऊ दिला नाही, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने केल्यामुळे पावसाळ्यातील चार महिनेही काम सुरू ठेवता आले. परिणामी, बेलासिस उड्डाणपूल नियोजित कालावधीपूर्वीच पूर्ण झाला असून, त्यामुळे ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









