BMC Election: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश ठिकाणी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने विजयी उमेदवारांची पळवापळवी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये ठाकरे गटाचे काही नगरसेवक फुटल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
सरिता म्हस्के यांच्या अनुपस्थितीमुळे सस्पेन्स
मुंबई महापालिकेच्या निकालानंतर ठाकरे गटाने आपल्या 65 नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला वॉर्ड क्रमांक 157 च्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के गैरहजर राहिल्याने त्या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली.
मात्र, यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पडदा टाकला आहे. “डॉ. सरिता म्हस्के आमच्याच संपर्कात असून त्यांनी कौटुंबिक कारणामुळे बैठकीला येता आले नसल्याचे सांगितले आहे. कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीसाठी एक महिन्याचा वेळ असून त्या निश्चितपणे नोंदणी करतील,” असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे.
फोडाफोडीच्या राजकारणाची चर्चा
रिपोर्टनुसार, केवळ मुंबईतच नाही तर कल्याण-डोंबिवलीतही नगरसेवकांच्या हालचाली वाढल्या आहेत. ठाकरेंचे 4 ते 5 नगरसेवक सत्ताधारी गटाच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठत आहेत. दुसरीकडे, मुंबईत भाजपने 89 जागांसह मोठे यश मिळवले असले तरी, सत्ता स्थापनेसाठी त्यांना शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांची मदत घ्यावी लागणार आहे. अशा स्थितीत अपक्ष आणि लहान पक्षांच्या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
22 जानेवारीला ठरणार ‘महापौर’ कोणाचा?
महापालिकांच्या निकालांनंतर आता सर्वांचे लक्ष 22 जानेवारीकडे लागले आहे. या दिवशी सकाळी 11 वाजता मंत्रालयात नगरविकास विभागामार्फत राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. आरक्षण नेमके कोणत्या प्रवर्गासाठी निघते, यावरच मुंबईसह इतर शहरांच्या महापौरपदाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. आरक्षण स्पष्ट झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने सत्तास्थापनेची समीकरणे वेगाने फिरू लागतील.
मुंबई महापालिकेचे पक्षनिहाय बलाबल
- भाजप: 89
- शिवसेना (ठाकरे गट): 65
- शिवसेना (शिंदे गट): 29
- काँग्रेस: 24
- मनसे: 6
- इतर (MIM, NCP, SP): 14
- एकूण जागा: 227









