Dombivli News : डोंबिवली शहरात शॉरमा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मराठी महिला व्यावसायिक एकता सावंत यांच्यावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून (केडीएमसी) करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठी चर्चा निर्माण झाली आहे. या कारवाईमागे अन्यायकारक भूमिका आणि अधिकाऱ्यांकडून भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप एकता सावंत यांनी केला आहे.
एकता सावंत या डोंबिवली परिसरात हातगाडीवर शॉरमा विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी असा दावा केला आहे की, पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या दररोज ३०० रुपये हप्ता देत होत्या. असे असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, परिसरातील इतर हातगाड्या आणि फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून, केवळ आपल्यालाच लक्ष्य करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या स्टॉलवरच वारंवार कारवाई होत असून इतर अनधिकृत हातगाड्या व फेरीवाले मात्र मोकाटपणे व्यवसाय करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. काही फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा गंभीर दावा करत, ही कारवाई निवडक आणि अन्यायकारक असल्याचे एकता सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
एकता सावंत या केवळ व्यावसायिकच नव्हे, तर सोशल मीडियावरही त्या चांगल्याच प्रसिद्ध आहेत. त्या एक रिल्स स्टार असून त्यांच्या सोशल मीडिया रिल्सना लाखो ते मिलियनच्या संख्येत व्ह्यूज मिळतात. त्यांच्या सोशल मीडिया खात्याला एक लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, अनेक तरुणांमध्ये त्या लोकप्रिय आहेत. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा आदर्श उभा करण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे त्या सांगतात.
पालिकेच्या कारवाईमुळे आपले आर्थिक नुकसान झाले असून मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला उद्योजक म्हणून संघर्ष करत असताना अशा प्रकारची वागणूक मिळणे दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे केडीएमसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य चौकशी व्हावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी एकता सावंत यांनी केली आहे.
पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर एकता सावंत यांनी नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती देत, त्यामागील कारणे आणि आपली बाजू ठामपणे मांडली. त्यांच्या या व्हिडीओची दखल थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्यामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला आहे.
राज ठाकरे यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी तात्काळ डोंबिवली येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी एकता सावंत यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. पक्ष त्यांच्या न्यायासाठी आवश्यक ती भूमिका घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एकता सावंत यांच्याबाबत घडलेल्या संपूर्ण प्रकारामुळे अविनाश जाधव आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. पालिकेच्या कारवाईवर त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मनसे संघर्ष करण्यास मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या घटनेमुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून, एकता सावंत यांना मिळालेल्या राजकीय पाठिंब्यामुळे हा मुद्दा आता केवळ स्थानिक न राहता व्यापक पातळीवर चर्चिला जात आहे. पुढील काळात या प्रकरणावर मनसेकडून कोणती ठोस भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डोंबिवली येथे एकता सावंत यांच्याशी संवाद साधताना त्यांनी आपली भावना अत्यंत भावनिक शब्दांत व्यक्त केली. “दादा, मला येथे एक टपरी टाकून द्या आणि त्या टपरीवर राजसाहेबांचा फोटो लावा. मी राजसाहेबांवर मनापासून प्रेम करते आणि त्यांना मनातून मतदान करते. त्यामुळे त्यांच्या छायाचित्रासह टपरी असल्यास मला कोणीही येथून हटवू शकणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका एकता सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांच्याशी बोलताना मांडली.
या संवादादरम्यान एकता सावंत यांनी राज ठाकरे यांच्याविषयी असलेली आपली निष्ठा आणि आपुलकी उघडपणे व्यक्त केली. आपल्यावर झालेल्या कारवाईनंतर असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे सांगत, राजसाहेबांच्या नावावर आणि छायाचित्रावर आपला विश्वास असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावर उत्तर देताना अविनाश जाधव यांनी त्यांना दिलासा देणारी भूमिका घेतली. “मला स्वतः राजसाहेबांनी तुला भेटण्यासाठी पाठवले आहे. तुझ्यावर नेमका काय अन्याय झाला आहे, कोणती अडचण निर्माण झाली आहे, हे सर्व आपण सविस्तर पाहून घेऊ,” असा विश्वास त्यांनी एकता सावंत यांना दिला. मनसे तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या संवादामुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. एकता सावंत यांच्या प्रश्नांकडे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गांभीर्याने लक्ष दिल्याचे स्पष्ट होत असून, त्याचाच भाग म्हणून अविनाश जाधव यांनी थेट भेट देऊन त्यांची बाजू समजून घेतली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली असून, पुढील काळात या विषयावर कोणती ठोस कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डोंबिवली परिसरात फेरीवाल्यांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, महापालिकेच्या भूमिकेबाबत गंभीर आरोप करण्यात येत आहेत. परप्रांतीय फेरीवाल्यांवर केडीएमसीचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असताना, मराठी फेरीवाल्या तरुणीवर मात्र कठोर कारवाई करण्यात आल्याने अन्याय झाल्याचा दावा पुढे येत आहे. या कथित दुटप्पी धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच परिसरातील अनेक फेरीवाले आपली वाहने व गाड्या घेऊन तात्काळ निघून जात असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ उडाल्याने या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मनसेकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले की, स्वतःचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या मराठी तरुणीवर झालेल्या कारवाईला पक्षाचा तीव्र विरोध आहे. अन्यायग्रस्त मराठी व्यावसायिकांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. केवळ निवडक घटकांवर कारवाई करून इतरांकडे दुर्लक्ष करणे हे अन्यायकारक असून, महापालिकेने सर्वांसाठी समान नियम लागू करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या घटनेनंतर डोंबिवलीतील स्थानिक नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले असून, महापालिकेच्या कारवाईत पारदर्शकता आणि समानतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे हे प्रकरण अधिकच गाजण्याची शक्यता असून, पुढील काळात या मुद्द्यावर महापालिका काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









