Dattaji Shinde Memorial : मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास आणि दिल्लीच्या रक्षणासाठी महाराष्ट्राने दिलेले बलिदान आता देशाच्या राजधानीत नव्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. मराठा सेनापती दत्ताजी शिंदे यांच्या सन्मानार्थ दिल्लीत एक भव्य स्मारक उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धापूर्वी अफगाण आक्रमकांशी लढताना दत्ताजी शिंदे यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून हे स्मारक उभारले जाणार आहे.
कोण होते दत्ताजी शिंदे?
दत्ताजी शिंदे हे शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजीराव शिंदे यांचे दुसरे पुत्र होते. उत्तर भारतात मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात आणि अफगाण आक्रमकांना रोखण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पंजाब प्रांतात अटकेपार झेंडे फडकावत अटक आणि पेशावरसारखे महत्त्वाचे किल्ले जिंकले होते.
पानिपतच्या युद्धाच्या सुमारे 1 वर्ष आधी बुराडी येथील ‘बरारी घाट’च्या लढाईत त्यांना वीरमरण आले. मृत्यू समोर दिसत असतानाही त्यांनी दिलेला “बचेंगे तो और भी लढेंगे” हा नारा आजही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक मानला जातो.
स्मारकाचे स्वरूप आणि ठिकाण
राज्य सरकारने जारी केलेल्या निर्णयानुसार, हे स्मारक दिल्लीतील बुराडी भागातील झरोदा माजरा मेट्रो स्टेशनजवळ उभारले जाण्याची शक्यता आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे दत्ताजी शिंदे यांनी शत्रूशी लढताना प्राणार्पण केले होते.
- अंमलबजावणी: महाराष्ट्र पर्यटन विभाग या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करेल.
- सुविधा: या स्मारकात दत्ताजी शिंदेंचा जीवनप्रवास आणि उत्तर भारतातील मराठ्यांच्या योगदानावर आधारित संग्रहालय, दुर्मिळ कागदपत्रे आणि ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण असू शकते.
- प्रकल्प अहवाल: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (MTDC) या स्मारकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राबाहेर मराठा वारसा जोपासण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र सरकार गेल्या काही काळापासून राज्याबाहेर असलेल्या मराठा इतिहासाशी संबंधित स्थळांचा विकास करत आहे. गेल्या वर्षी आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. आता दिल्लीत दत्ताजी शिंदेंचे स्मारक उभारून मराठ्यांचा पराक्रम आणि त्यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी केलेले बलिदान भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे.









