Healthy Choco Lava Cake Recipe : विकेंडला काहीतरी गोड आणि चविष्ट खाण्याची इच्छा झाली की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गरम आणि मऊ ‘चोको लावा केक’. मात्र, बाहेरून विकत घेतलेल्या केक मध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि अनहेल्दी फॅट्स असतात. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याशी तडजोड न करता या पदार्थाचा आनंद घ्यायचा असेल, तर घरीच हा केक बनवणे हा एक उत्तम पर्याय आहे. साध्या आणि मोजक्या साहित्यात तुम्ही डोमिनोजसारखा मेल्टेड चॉकलेट असलेला केक सहज तयार करू शकता.
आवश्यक साहित्य:
- 40 ग्रॅम ओट्सचे पीठ किंवा गव्हाचे पीठ
- साखर नसलेली कोको पावडर (चवीनुसार)
- गोडव्यासाठी मध, खजूर किंवा नैसर्गिक स्वीटनर
- 1-2 चिमूट खाण्याचा सोडा आणि 1 चिमूट बेकिंग पावडर
- दूध (मिश्रण तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार)
- चॉकलेट गॅनाशसाठी: 3 भाग डार्क चॉकलेट आणि 1 भाग दूध
कसा तयार कराल चोको लावा केक?
1. चॉकलेटचे मिश्रण तयार करा – सर्वात आधी डार्क चॉकलेट वितळवून घ्या आणि त्यात थोडे दूध मिसळा. हे मिश्रण गुळगुळीत आणि चमकदार होईपर्यंत हलवा. त्यानंतर हे मिश्रण थोडे घट्ट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
2. केकचे पीठ तयार करा एका बाऊलमध्ये ओट्सचे पीठ, कोको पावडर, सोडा आणि बेकिंग पावडर एकत्र करा. त्यात थोडे थोडे दूध घालून एक चांगले गुळगुळीत मिश्रण तयार करा. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
3. लेयरिंग करा – एक ओव्हन-सेफ बाऊल किंवा मग घ्या. त्यात अर्धे पीठ ओता. मधोमध फ्रिजमध्ये ठेवलेले चॉकलेट गॅनाश एक चमचा भरून ठेवा आणि वरून राहिलेले पीठ ओतून ते पूर्णपणे झाकून टाका.
4. बेकिंगची पद्धत
- ओव्हनमध्ये: 170 ते 180 अंश सेल्सिअस तापमानावर 15 ते 17 मिनिटे बेक करा.
- एअर फ्रायरमध्ये: 150 अंश सेल्सिअसवर 15 ते 17 मिनिटे बेक करा.
जेव्हा केकचा वरचा भाग सेट झालेला दिसेल आणि मधला भाग मऊ असेल, तेव्हा तो तयार झाला असे समजावे. हा केक गरम असतानाच खावा, जेणेकरून त्यातील वितळलेल्या चॉकलेटची खरी मजा घेता येईल.









