VBT's support for BJP! : चंद्रपूर महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठी उबाठाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यामुळे महापौर पदावरून राजकीय तिढा निर्माण झाला आहे. मात्र अडीच वर्षे महापौरपद मिळवण्यासाठी आता उबाठा पक्ष भाजपाला पाठिंबा द्यायला तयार झाला आहे. ही सर्व राजकीय चेष्टा सुरू आहे. उबाठाने अडीच वर्षे महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद यांची मागणी काँग्रेसकडे केली. पण ती मागणी अद्याप मान्य झालेली नाही. जो पक्ष महापौरपद देईल त्याला पाठिंबा देणार असल्याचे संकेत उबाठाच्या स्थानिक नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे उबाठा आता भाजपाबरोबर जाईल, असे जवळजवळ नक्की झाले आहे.
उबाठाच्या 6 नगरसेवकांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी सांगितले की, उबाठा आणि वंचित युतीचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. 2 अपक्ष नगरसेवकांनी आमच्या युतीला समर्थन दिले आहे. या 10 नगरसेवकांचा गट स्थापन झाला आहे. गटस्थापनेनंतर आम्ही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. यापुढे उद्धव ठाकरे जे मार्गदर्शन करतील तोच आमचा सर्वांचा निर्णय असणार आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून सत्तास्थापनेच्या पाठिंब्यासाठी संपर्क केला जात आहे. मात्र याठिकाणी खायला दिले आणि खाता येत नाही अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. आम्ही यासंदर्भातील निर्णय सर्वस्वी पक्षप्रमुखांवर सोडला आहे. परंतु आमची स्पष्ट मागणी आहे की, अडीच वर्षे महापौरपद उबाठा युतीला मिळावे आणि जेव्हा महापौरपद नसेल तेव्हा उपमहापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद मिळावे. जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी आज पुन्हा म्हटले की, युती कोणासोबत करायची यापेक्षा आमचा महापौर कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. आमच्या पक्षाकडे महापौरपद घेऊन चंद्रपूरचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत.
या महापालिकेत काँग्रेस 27 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाचे 23, उबाठाचे 6, जनविकास सेना 3, वंचित बहुजन आघाडी 2 तर शिंदे गट, बसपा आणि एमआयएमचे प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस आणि जनविकास सेनेची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने काँग्रेसकडे एकूण 30 चे संख्याबळ आहे. तर भाजपा व शिंदे गट मिळून 24 नगरसेवक आहेत.
—————————————————————————————————————————-
हे देखील वाचा –
: कल्याणमध्ये मराठी–परप्रांतीयांमध्ये भांडी खरेदीवरून रस्त्यावर वाद
राज ठाकरेंचे खाजगी डॉ. यादव दादरला दवाखाना! प्रसिद्धीपासून दूर









