PadmBhushan to Koshyari : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने 2026 सालचे पद्म पुरस्कार जाहीर केले. यात महाराष्ट्राला धक्का बसेल असा एक पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे पूर्व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सार्वजनिक कार्य (पब्लिक अफेअर्स) यासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार सत्तेवर असताना कोश्यारी यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते. किंबहुना 2022 साली उद्धव ठाकरे सरकारचे बहुमत गेले असे जाहीर करून भाजपाला सत्ता स्थापनेसाठी बोलविण्यात कोश्यारी यांनी सर्व कायदे तोडले अशी खरमरीत टीका सर्वोच्च न्यायालयाने केली होती. न्यायालयाने टीका केली तरी कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. फक्त महाराष्ट्रात नवीन राज्यपाल आणून कोश्यारी यांना त्यांच्या मूळ उत्तराखंड राज्यात पाठविण्यात आले. मात्र त्यांनी महाराष्ट्रात जे केले त्याचे आज त्यांना बक्षीस दिले का, असा सवाल हा पुरस्कार दिल्याने उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल असताना उद्धव सरकारने पाठविलेली विधान परिषद नियुक्त आमदारांची यादी कोश्यारी यांनी फेटाळली. त्यानंतर भाजपा सरकारने पाठवलेली यादी स्वीकारली आणि हे प्रकरण कोर्टात पोहोचले. अजूनही त्या नेमणुका स्थगित आहेत, राज्यपाल म्हणून कोश्यारी यांनी विद्यापीठ आणि आदिवासी क्षेत्रात उद्धव ठाकरे सरकारला डावलून किंवा सरकारच्या विरोधात जाऊन बैठका घेतल्या, वादग्रस्त निर्णय घेतले. त्यांची राज्यपाल पदाची कारकीर्द ही बिगर भाजपा सरकारला त्रस्त करण्यात खर्च झाली. त्यांना राज्यपाल पदावरून मुक्त केले तेव्हा विरोधकांनी सुटकेचानिःश्वास सोडला. आज त्यांनाच सार्वजनिक कार्यासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातून या निर्णयावर सवाल उपस्थित होत आहेत.
एकूण 5 जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण आणि 114 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार, प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक, उद्योगपती उदय कोटक, पीयूष पांडे यांना पद्मभूषण, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा, लोककलावंत रघुवीर खेडकर, आदिवासी वाद्य तारपा वादक 92 वर्षांचे भिकल्या धिंडा, कृषिसाठी श्रीरंग देवबा लाड आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी आर्मिदा फर्नांडीस यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. हे सर्व मान्यवर महाराष्ट्रातील असून महिला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारी कर्णधार हरमनप्रीत कौर हिला (पंजाब) पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
लोकनाट्य तमाशा या परंपरागत कलेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी रघुवीर खेडकर यांनी योगदान दिले आहे. तर पालघर जिल्ह्यातील भिकल्या धिंडा यांनी वारली लोकसंगीत जागतिक स्तरावर नेले. कृषी क्षेत्रातील संशोधनासाठीओळखले जाणारे परभणी येथील शेतकरी श्रीरंग देवबा लाड यांनी कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी केलेल्या प्रयोगशील संशोधनाची दखल केंद्र सरकारने घेतली. तर मुंबईतील बालरोगतज्ज्ञ डॉ. अर्मिडा फर्नांडीस यांनी आशियातील पहिली ‘ह्यूमन मिल्क बँक’ स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. त्यांच्या कार्यामुळे शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत झाली आहे. त्यांच्या या कार्याच्या योगदानामुळे त्यांना यावर्षी प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री तर आर. माधवन, प्रोसेनजीत चॅटर्जी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. माजी झारखंड नेते शिबू सोरेन (मरणोत्तर) यांनाही पद्मभूषण बहाल केले आहे. तर क्रीडा क्षेत्रात भारताचे दिग्गज टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्यासह माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार, भारतीय महिला हॉकी संघाची गोलकिपर सविता पुनिया, महिला हॉकीतील मार्गदर्शक बलदेव सिंग यांनाही पद्मश्रीने गौरवण्यात आले आहे. के.टी.थॉमस, (सार्वजनिक कार्य, केरळ), एन.राजम (वायलिन वादक, उत्तर प्रदेश), पी.नारायणन (साहित्य आणि शिक्षण, केरळ) व्ही.एस. अच्युतानंदन (मरणोत्तर) (सार्वजनिक कार्य, केरळ) यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. डॉ. कालीपट्टी रामासामी पलानीस्वामी, (वैद्यकीय, तामिळनाडू) ज्येष्ठ अभिनेते मामूटी, (केरळ),डॉ. नोरी दत्तात्रेयडू-(वैद्यकशास्त्र, अमेरिका), एस. के.एम.मायलानंद (सामाजिक कार्य, तामिळनाडू), शतावधानी आर. गणेश (कला, कर्नाटक), शिबू सोरेन (मरणोत्तर) – लोक कार्य (झारखंड), व्ही.के. मल्होत्रा (मरणोत्तर) लोक कार्य.(दिल्ली)वेल्लापल्ली नटेसन (लोक कार्य. केरळ), विजय अमृतराज (क्रीडा, अमेरिका) यांना पद्मभूषण देण्यात येणार आहे.
राज्याचा अपमान करणार्यांचा भाजपाकडून सन्मान
कोश्यारींना पद्मभूषण जाहीर होताच उबाठाचे खा. संजय राऊत यांनी एक्स पोस्ट करून सांगितले की, महाराष्ट्रात लोकशाही व भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी
राज्यातील 75 पोलिसांचा पदकांनी गौरव
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस पदकांची घोषणा केली असून महाराष्ट्रातील 75 पोलिसांना विविध पदकांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये 31 जणांना शौर्य पदक, 4 अधिकार्यांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ आणि 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक‘जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील अतिरिक्त आयुक्त महेश उदाजी पाटील, अतिरिक्त उपायुक्त बाळकृष्ण मोतीराम यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त सायरस बोमन इराणी, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ देण्यात येणार आहे. या यादीत नागपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय मारोतीराव माहुलकर, पोलीस उपअधीक्षक पराग बापूराव पोटे आणि पोलीस निरीक्षक कैलाश रामजी बाराभाई यांचा समावेश आहे. विजय माहुलकर यांनी गुन्हे उकल, अमली पदार्थविरोधी कारवाई आणि वाहतूक व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून यंदा देशभरातील एकूण 982 पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा कर्मचार्यांना विविध पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये 125 शौर्य पदकांचा समावेश असून त्यापैकी सर्वाधिक 45 पदके जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन थिएटरमध्ये कार्यरत कर्मचार्यांना देण्यात आली आहेत. नक्षलप्रभावित भागातील 35 आणि ईशान्य भारतातील 5 कर्मचार्यांनाही शौर्य पदक देण्यात आले आहे.
—————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
अडीच वर्षे महापौरपदासाठी चंद्रपूर पालिकेत उबाठाचा भाजपाला पाठिंबा! काँग्रेस पेचात
कल्याणमध्ये मराठी–परप्रांतीयांमध्ये भांडी खरेदीवरून रस्त्यावर वाद









