MHADA Lottery 2026 : मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची (BMC Election 2026) आचारसंहिता संपताच म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाकडून घरांच्या लॉटरीचा धमाका होणार आहे. रिपोर्टनुसार, मार्च 2026 मध्ये म्हाडा सुमारे 7,000 घरांची मोठी लॉटरी जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई आणि कोकण मंडळाची जय्यत तयारी
मुंबईत जागेच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना, म्हाडाची घरे सर्वसामान्यांना मोठा आधार देतात. म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुमारे 3,000 घरांसाठी लॉटरीची प्रक्रिया सुरू केली आहे.
यामध्ये अंधेरी, गोरेगाव आणि चेंबूर यांसारख्या मोक्याच्या ठिकाणच्या घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यासोबतच, कोकण मंडळाकडूनही ठाणे, कल्याण, विरार आणि नवी मुंबई परिसरातील सुमारे 4,000 घरांची सोडत काढली जाणार आहे.
पायाभूत सुविधांवर विशेष भर
यावेळी म्हाडाने केवळ घरे बांधण्यावरच नाही, तर त्या परिसरातील पायाभूत सुविधांवरही लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः कोकण मंडळाच्या प्रकल्पांमध्ये रस्ते, पाणी आणि विजेची कामे पूर्ण करूनच घरांचा ताबा दिला जावा, याकडे प्रशासनाचा कल आहे. यामुळे ग्राहकांमध्ये म्हाडाच्या घरांबाबत असलेला विश्वास अधिक दृढ होणार आहे.
७६ वर्षांचा देदीप्यमान वारसा
म्हाडाने गेल्या 76 वर्षांत महाराष्ट्रात सुमारे 9 लाख कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. सध्या मुंबईत बी.डी.डी. चाळ पुनर्विकास, पत्राचाळ आणि मोतीलाल नगर यांसारखे मोठे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाची घरे स्वस्त असल्याने दरवर्षी लाखो अर्जदार या लॉटरीसाठी अर्ज करतात.









