Home / महाराष्ट्र / Eknath Shinde BMC Election 2026 : संयुक्त गट नकोच; शिंदेसेनेची स्वतंत्र नोंदणी करण्याची तयारी; बीएमसीत स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी शिंदेसेनेचा मोठा निर्णय

Eknath Shinde BMC Election 2026 : संयुक्त गट नकोच; शिंदेसेनेची स्वतंत्र नोंदणी करण्याची तयारी; बीएमसीत स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी शिंदेसेनेचा मोठा निर्णय

Eknath Shinde BMC Election 2026 : मुंबई महापालिकेतील वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्यसंख्येवरून सुरू झालेल्या चर्चांमुळे सुरुवातीला असा अंदाज व्यक्त...

By: Team Navakal
Eknath Shinde BMC Election 2026
Social + WhatsApp CTA

Eknath Shinde BMC Election 2026 : मुंबई महापालिकेतील वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्यसंख्येवरून सुरू झालेल्या चर्चांमुळे सुरुवातीला असा अंदाज व्यक्त केला जात होता की भाजप आणि शिवसेना शिंदे गट संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी करेल. मात्र, संयुक्त नोंदणी केल्यास पुढील पाच वर्षे महापालिकेत भाजपचे धोरण स्वीकारावे लागेल आणि शिंदेसेनेचा स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल, ही बाब लक्षात घेता शिंदेसेनेने स्वतंत्र पक्ष म्हणून गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाला (BMC Election 2026) दहा दिवस उलटून गेले असले तरी बहुमत मिळालेल्या भाजप–शिंदेसेना युतीने अद्याप कोकण आयुक्तांकडे गट नोंदणी केलेली नाही. महापौरपद, उपमहापौरपद तसेच विविध वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षपदांसह सदस्यसंख्येवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सविस्तर चर्चा सुरू होती. विशेषतः पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीतील सदस्यसंख्येवर गणित मांडले जात होते.

सध्याच्या रचनेनुसार स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधकांची सदस्यसंख्या समसमान आहे. शिक्षण समितीचे अध्यक्ष पदसिद्ध असल्याने सत्ताधारी गट केवळ एका सदस्याने आघाडीवर आहे. शिक्षण समिती अध्यक्ष वगळता सत्ताधारी व विरोधकांचे प्रत्येकी १३–१३ सदस्य स्थायी समितीवर जातील, अशी स्थिती आहे.

संयुक्त गट नोंदणी झाल्यास सत्ताधाऱ्यांचा फायदा
भाजप आणि शिंदेसेनेची संयुक्त गट नोंदणी झाल्यास गुणोत्तर प्रमाणात बदल होऊन सत्ताधारी गटाचा एक सदस्य वाढू शकतो. मात्र, एकत्रित गट नोंदणी झाल्यानंतर महापालिकेत भाजप–शिंदेसेनेचा एकच गटनेता असेल. सभागृहात तसेच सर्व समित्यांमध्ये भाजप जी भूमिका घेईल, तिला शिंदेसेनेला बंधनकारकरीत्या पाठिंबा द्यावा लागेल. तसेच महापालिकेत दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालयाऐवजी एकच कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. समित्यांवर शिंदेसेनेला किती प्रतिनिधित्व द्यायचे, याचा अंतिम निर्णय भाजपच्या गटनेत्याकडे राहील, अशी अट चर्चेत होती.

शिंदेसेना स्वतंत्र गट नोंदणी करणार
सध्याच्या पक्षीय बलबळानुसार, स्वतंत्र नोंदणी झाल्यास स्थायी समितीवर भाजपचे ८ आणि शिंदेसेनेचे ३ सदस्य जाण्याची शक्यता आहे. मात्र, संयुक्त गट झाल्यास शिंदेसेनेचे किती सदस्य स्थायी समितीवर पाठवायचे, हा अधिकार भाजपकडेच राहिला असता. यामुळे शिंदेसेनेने स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

या निर्णयामुळे महापालिकेत भाजप–शिंदेसेना युती कायम राहणार असली, तरी सत्तेतील समतोल आणि समित्यांवरील वाटाघाटींना नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या