Pune News : “सदरक्षणाय खलनिग्रहनाय” या उदात्त ब्रीदवाक्यानुसार समाजातील सज्जनांचे रक्षण आणि गुन्हेगारांचे दमन करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र, अहिल्यानगर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने केलेल्या गंभीर गैरप्रकारामुळे या खाकी वर्दीवर काळा डाग लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस हवालदार शामसुंदर गुजर आणि त्याच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर पोलीस दलातील काही अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आले असून, पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातून जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ चोरून ते बाहेर विकले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, पोलीस हवालदार शामसुंदर गुजर हा स्वतः अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गैरप्रकारात आणखी कोणकोणते पोलीस अधिकारी सहभागी आहेत का, याचा सखोल तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा १७ जानेवारी रोजी झाला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शादाब शेख या गॅरेज चालकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करत असताना रंगेहात अटक केली. तो दुचाकीवरून अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईदरम्यान त्याच्याकडून सुमारे एक किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत, शादाब शेख याने अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे, ऋषिकेश चित्तर आणि महेश गायकवाड यांच्याकडून अंमली पदार्थ मिळाल्याची कबुली दिली. पुढील तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असता, त्यांच्याकडून आणखी ९ किलो ६५५ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा स्रोत शोधताना, या साखळीचा धागा थेट अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस हवालदार शामसुंदर गुजर याच्यापर्यंत पोहोचला. तपासात स्पष्ट झाले की, हे अंमली पदार्थ त्यानेच संबंधित आरोपींना पुरवले होते. आत्तापर्यंत या प्रकरणात एकूण १० किलो ७०७ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, शामसुंदर गुजर हा अहिल्यानगर पोलीस दलातील मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांतील जप्त मालामधून अंमली पदार्थ काढून त्यांची विक्री करत होता. मूळ जप्त मालाऐवजी तशाच स्वरूपाच्या बनावट वस्तू ठेवून तो गैरप्रकार लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाच्या अंतर्गत नियंत्रण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ न्यायालयाच्या आदेशानुसार सील करून अधिकाऱ्यांच्या सहीनिशी मुद्देमाल कक्षात सुरक्षित ठेवले जातात. अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय किंवा दुर्लक्षाशिवाय हा प्रकार शक्य नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः मे २०२५ मध्ये श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त करण्यात आलेला हा मुद्देमाल डिसेंबर महिन्यात कक्षातून चोरीला गेला असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अंमली पदार्थांसह गुन्ह्यात वापरलेली वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग आढळून आलेला नाही. मात्र, प्रकरणाचे धागेदोरे खोलवर पसरलेले असल्याने अधिक तपास आवश्यक असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अंमली पदार्थ तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात थेट पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग उघड झाल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून, आगामी काळात या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.









