Home / महाराष्ट्र / Metro Line – 8 : मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडले जाणार; मेट्रो लाईन–८ ला मंजुरी

Metro Line – 8 : मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडले जाणार; मेट्रो लाईन–८ ला मंजुरी

Metro Line – 8 : देशातील प्रमुख विमानतळांपैकी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ...

By: Team Navakal
Metro Line - 8
Social + WhatsApp CTA

Metro Line – 8 : देशातील प्रमुख विमानतळांपैकी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना मेट्रोने थेट जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ‘मेट्रो लाईन–८’चा मार्ग उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.

या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

‘मेट्रो लाईन–८’ची एकूण लांबी ३५ किलोमीटर इतकी असणार आहे. यापैकी ९.२५ किलोमीटर मार्ग भूमिगत तर २४.६३६ किलोमीटर मार्ग उन्नत स्वरूपाचा असणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण २० स्थानके प्रस्तावित असून, त्यात ६ भूमिगत आणि १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल–२ ते घाटकोपर पूर्वपर्यंतचा मेट्रो मार्ग भूमिगत असणार आहे. त्यानंतर घाटकोपर पश्चिम स्थानकापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल–२ पर्यंतचा संपूर्ण मार्ग उन्नत स्वरूपाचा असेल. दोन स्थानकांमधील सरासरी अंतर सुमारे १.९ किलोमीटर ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे ३०.७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असून, त्यासाठी अंदाजे ३८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण मेट्रो लाईन–८ प्रकल्पासाठी एकूण २२ हजार ८६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मेट्रो लाईन–८ संदर्भातील भूसंपादनासह सर्व प्रकारच्या प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेण्यावर सरकारकडून विशेष भर देण्यात आला आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या