Mira Bhayandar Flyover: मिरा-भाईंदर शहरात वाहतुकीची समस्या मार्गी लावण्यासाठी बांधण्यात आलेला एक नवीन उड्डाणपूल सध्या सोशल मीडियावर थट्टेचा विषय बनला आहे. या पुलाच्या अत्यंत विचित्र आणि धोकादायक रचनेमुळे इंजिनिअरिंगच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मिरा रोड ते भाईंदर या भागांना जोडणाऱ्या या पुलाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी याला प्रशासनाचा ‘नियोजनशून्य कारभार’ म्हटले आहे.
नेमका घोळ काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, पुलाची सुरुवात अत्यंत भव्य अशा ४ लेनने (4-Lane) होते. मात्र, पुलाच्या मधोमध पोहोचल्यावर हा रस्ता अचानक अरुंद होतो आणि दुसऱ्या टोकाला तो केवळ २ लेनचाच उरतो. ४ पदरी रस्त्यावरून वेगाने येणारी वाहने जेव्हा अचानक २ पदरी रस्त्यावर येतात, तेव्हा तिथे वाहनांची कोंडी होऊन अपघातांची शक्यता वाढली आहे.
नागरिकांची उपरोधिक टीका
स्थानिक रहिवासी आणि सोशल मीडिया युजर्सनी या पुलाच्या रचनेवर जोरदार टीका केली आहे. काहींनी उपरोधाने याला ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ म्हटले आहे, तर काहींनी “असे डिझाइन कोणी मंजूर केले?” असा संतप्त सवाल विचारला आहे. “कोंडी फोडण्यासाठी बांधलेला पूल आता स्वतःच कोंडीचे कारण बनणार,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.
अशी रचना का करण्यात आली?
रिपोर्टनुसार, या परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने आणि जागेची कमतरता असल्यामुळे पुलाची रचना अशा प्रकारे करावी लागली असावी. परंतु, तज्ज्ञांच्या मते ४ लेनवरून अचानक २ लेनवर वाहने वळवणे चालकांसाठी अत्यंत धोकादायक आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा गर्दीच्या वेळी येथे मोठी टक्कर होण्याची भीती आहे.
या संपूर्ण प्रकरणावर ‘एमएमआरडीए’ (MMRDA) किंवा स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. हा पूल संपूर्ण ४ पदरी कधी होणार किंवा ही समस्या कशी सुटणार, याची प्रतीक्षा आता मिरा-भाईंदरकर करत आहेत.









