Ajit Pawar Plane Accident : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये भीषण अपघात झाला आहे.
बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना हे विमान जवळच्या एका शेतात कोसळले असून यामध्ये काही जण गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने विमानाने रवाना झाले होते. बारामतीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर सभांसाठी ते तिथे पोहोचणार होते. मात्र, बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीवरून घसरून थेट जवळच्या शेतात जाऊन कोसळले.
#WATCH | A plane crash reported in Baramati, Maharashtra. More details awaited.
— ANI (@ANI) January 28, 2026
Visuals from the spot. pic.twitter.com/xkx0vtY5cp
जखमींबाबत प्राथमिक माहिती
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात स्वतः अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले काही सहकारी जखमी झाले आहेत. विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबत इतर कोण मोठे नेते किंवा अधिकारी होते, याची अधिकृत यादी अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, विमानाचे नुकसान मोठे झाले असून जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या दुर्घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असून, अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती येणे अजून बाकी आहे.









