Home / महाराष्ट्र / Ajit Pawar Plane Crash : जीवघेणं ठरलं ‘लिअरजेट ४५’! अजित पवारांच्या अपघातानंतर विमानसेवेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित-यापूर्वी कोसळले होत अजित पवार प्रवास करत असलेल्या कंपनीचं विमान..

Ajit Pawar Plane Crash : जीवघेणं ठरलं ‘लिअरजेट ४५’! अजित पवारांच्या अपघातानंतर विमानसेवेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित-यापूर्वी कोसळले होत अजित पवार प्रवास करत असलेल्या कंपनीचं विमान..

Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला असून, राज्यभर शोककळा पसरली...

By: Team Navakal
Ajit Pawar Plane Crash
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला असून, राज्यभर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राजकीय, सामाजिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातून तीव्र शोकभावना व्यक्त होत आहे. मात्र, या अपघातानंतर समोर आलेली एक बाब अधिकच अस्वस्थ करणारी ठरत आहे. शिवाय हा अपघात ज्या विमानाचा झाला ते ‘लियरजेट ४५’ (Learjet 45) प्रकारचे असून त्याचे संचालन ‘व्हीएसआर वेंचर्स’ या कंपनीकडून करण्यात येत होते. ज्या लिअरजेट ४५ प्रकारच्या विमानाचा हा अपघात झाला, त्याच श्रेणीच्या विमानाला यापूर्वीही भीषण अपघाताला सामोरे जावे लागले होते, ह्या बद्दलची माहिती समोर आली आहे.

सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबई विमानतळावर लिअरजेट ४५ प्रकारच्या विमानाचा गंभीर अपघात झाला होता. त्या घटनेतही मोठे नुकसान झाले होते आणि विमान सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे, दोन्ही अपघातांमध्ये सहभागी असलेली विमाने एकाच कंपनीची असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे या कंपनीच्या विमानांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे तांत्रिक देखभाल, सुरक्षा मानके आणि नियामक यंत्रणांची जबाबदारी यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या लियरजेट–४५ या विमानातून प्रवास करत होते, ते विमान दिल्ली येथील खासगी जेट व चार्टर्ड विमानसेवा पुरवणाऱ्या VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून चालवले जाते. या कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह आहेत. ही कंपनी हवाई वाहतूक क्षेत्रात १५ वर्षांपासून सक्रिय आहे. या विमानाच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, भोपाळ तसेच हैदराबाद अशा प्रमुख शहरांदरम्यान उड्डाणे नियमितपणे सुरु होती.

VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या विमानसेवा व्यवस्थेत एकूण साठ वैमानिक कार्यरत असून, विविध चार्टर्ड व खासगी उड्डाणांची जबाबदारी देखील ते सांभाळतात. लियरजेट–४५ या विमानाची प्रवासी वाहतूक क्षमता एकूण नऊ प्रवाशांची आहे. मर्यादित प्रवासी क्षमतेमुळे हे विमान प्रामुख्याने विशेष प्रवास, अधिकृत दौरे व वेळेची निकड असलेल्या प्रवासासाठी वापरले जाते.

यापूर्वीही, १४ सप्टेंबर २०२३ रोजी VSR वेंचर्स कंपनीचे लीयरजेट ४५ हे चार्टर्ड विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना भीषण अपघात झाला होता. ह्या विमानाचा सकाळी सुमारे ११:३२ वाजता अपघात घडला. मुसळधार पावसामुळे आणि अत्यंत कमी दृश्यमानतेमुळे लँडिंगदरम्यान नियंत्रण बिघडल्याने हे विमान विमानतळाच्या टॅक्सी-वेच्या जवळ घसरत जाऊन जोरात आदळले आणि त्याचे दोन तुकडे झाले, त्यानंतर विमानाला तात्काळ आग लागली.

या विमानाने विशाखापट्टणमहून उड्डाण केले होते आणि त्यामध्ये पायलट, सह-पायलट तसेच सहा प्रवासी प्रवास करत होते. अपघात इतका तीव्र होता की विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी सह-पायलटची प्रकृती अत्यंत गंभीर बनली होती. त्यांच्यावर दीर्घकाळ रुग्णालयात अतिदक्षता उपचार सुरू होते. दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य राबवण्यात आले आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे काही काळ विमानतळावरील वाहतूकही प्रभावित झाली होती. खराब हवामान, जोरदार पर्जन्यवृष्टी आणि तांत्रिक अडचणी यांचा या दुर्घटनेशी संबंध असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

दरम्यान वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी एक्सवर यासंदर्भात खळबजनक दावा केलेला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नुकत्याच घडलेल्या विमान अपघाताबाबत विमान कंपनी VSR कडे बोट दाखवले आहे. सुहेल सेठ यांच्या मते, या अपघातामागे कंपनीच्या व्यवस्थापनातील काही तांत्रिक किंवा नियोजनसंबंधी त्रुटी असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हा गंभीर प्रकार घडला. या पोस्टमुळे अनेकांनी सोशल मीडियावर कंपनीच्या सुरक्षा नियमांवर आणि विमानतळावरच्या तांत्रिक तपासणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दुसरे विमान झाले क्रॅश
सुहेल सेठ यांनी आपल्या एक्सवर अनेक गंभीर मुद्दे स्पष्ट केले आहेत. त्यांनी सांगितले की, “आज सकाळी जो विमान अपघात झाला, ते VSR Aviation कंपनीच्या मालकीचे होते. ही कंपनी सराईत गुन्हेगारांच्या स्वरूपाची आहे. हे त्यांचे दुसरे विमान आहे जे क्रॅश झाले आहे. कंपनी पिता-पुत्र यांच्यामार्फत चालवली जाते. ते लोक DGCAIndia या संस्थेवर प्रभाव असल्याचे लोकांना सांगत फिरतात, जणू काही नियम किंवा निरीक्षण त्यांच्या खिशात आहेत. ही चार्टर कंपनी ताबडतोब बंद केली पाहिजे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सुहेल सेठ यांच्यानंतर तेहसीन पुनावाला यांनीही याबाबत ट्विट करत गंभीर चिंता व्यक्त केली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी नमूद केले की, अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान VSR Aviation कंपनीचे होते आणि या कंपनीचे हे दुसरे विमान अपघातग्रस्त झाल्याची बाब अत्यंत धक्कादायक आहे.

गेल्या काही वर्षांत देशभरात अनेक विमाने व हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याच्या घटनांचा उल्लेख करत, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) आता तरी या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली असून शेवटी ‘ओम शांती’ असे शब्द त्यांनी एक्समध्ये नमूद केले आहेत.

VSR Aviation चा तीन वर्षातला दुसरा मोठा अपघात
VSR Aviation कंपनीच्या विमानाचा हा गेल्या तीन वर्षांत दुसरा मोठा गंभीर अपघात आहे. यापूर्वी, १४ सप्टेंबर २०२३ रोजी, मुंबई विमानतळावर विशाखापट्टणम येथून आलेल्या विमानाचे लँडिंग दरम्यान अपघात घडला होता. प्राथमिक तपासणीत समोर आले की, त्या दिवशी पावसामुळे विमान धावपट्टीवरून घसरले होते. या विमानात सहा प्रवासी व चालक दलाचे सदस्य होते, ज्यामध्ये सहवैमानिक गंभीर जखमी झाला होता. या अपघातामुळे विमान सुरक्षा आणि चार्टर सेवांच्या नियमांचे पालन किती काटेकोरपणे केले जाते, यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कंपनीने आरोप फेटाळले-
दरम्यान, मुंबई विमानतळावर नुकत्याच झालेल्या विमान अपघाताबाबत ‘व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (VSR Aviation) या कंपनीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. अपघातानंतर दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह यांनी या दुर्दैवी घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विमान उतरवण्याचा अंतिम निर्णय हा सर्वस्व वैमानिकाचा होता आणि बदलत्या परिस्थितीनुसार त्यांनी सुरक्षित लँडिंगसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिकाने सुरुवातीला ‘रनवे २९’ (धावपट्टी क्र. २९) वर विमान उतरवण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्या क्षणी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना तिथे लँडिंग करणे शक्य झाले नाही. सुरक्षिततेचा विचार करून वैमानिकाने तातडीने निर्णय बदलला आणि ‘रनवे ११’ वर विमान उतरवण्याचा पुन्हा प्रयत्न केला. दुर्दैवाने, याच दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमानाला भीषण अपघात झाला.

तांत्रिक बिघाड नव्हता, विमानाची स्थिती उत्तम होती – कंपनीचा दावा
मुंबईत झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर, ‘व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (VSR Aviation) या कंपनीने विमानाची तांत्रिक स्थिती आणि देखभालीबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, अपघातग्रस्त विमान पूर्णपणे सुस्थितीत होते आणि उड्डाणापूर्वी त्यात कोणताही तांत्रिक दोष आढळला नव्हता.

कंपनी संचालकांनी व्यक्त केला वैयक्तिक शोक
विमानाचा अपघात हा तांत्रिक बिघाडामुळे नसून, अत्यंत कमी झालेली दृश्यमानता (Visibility) आणि धावपट्टी स्पष्टपणे न दिसल्यामुळे झाला असावा, असे त्यांनी नमूद केले. विमान उतरवताना वैमानिकाला हवामानातील बदलांमुळे धावपट्टीचा अंदाज आला नसावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली असून सध्या कंपनी पूर्णपणे शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी उभी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनुभवी वैमानिकांचे नेतृत्त्व
विमानाच्या क्रू सदस्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करताना सिंह यांनी माहिती दिली की, मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर हे अत्यंत अनुभवी होते. त्यांना १६,००० तासांहून अधिक काळ उड्डाण करण्याचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यांनी यापूर्वी ‘सहारा एअरलाइन’, ‘जेतलाईट’ आणि ‘जेट एअरवेज’ यांसारख्या नामवंत कंपन्यांमध्ये सेवा बजावली होती. त्यांच्यासोबत असलेल्या सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनाही सुमारे १५०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. हे दोन्ही वैमानिक या विशिष्ट श्रेणीतील विमाने चालवण्यात पूर्णपणे निष्णात होते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

भावूक नाते आणि वैयक्तिक हानी
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना विजय कुमार सिंह भावूक झाले. “कॅप्टन सुमित कपूर हे केवळ कर्मचारी नसून माझे जीवाभावाचे मित्र आणि भावासारखे होते. त्यांचा मुलगाही आमच्याच कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत आहे. तर कॅप्टन शांभवी पाठक या माझ्यासाठी मुलीसारख्या होत्या,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ही दुर्घटना कंपनीसाठी केवळ व्यावसायिक नुकसान नसून एक मोठी कौटुंबिक शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.

भूतकाळातील संदर्भ आणि तपासाची दिशा
२०२३ मध्ये झालेल्या अशाच एका घटनेचा संदर्भ देताना सिंह म्हणाले की, त्यावेळची परिस्थिती भिन्न होती. त्यावेळीही पावसामुळे दृश्यमानता कमी होती आणि विमान धावपट्टीवरून घसरले होते. मात्र, सद्यस्थितीत तांत्रिक तपासणी आणि विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ (Flight Data Recorder) विश्लेषित केल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि संबंधित तपास यंत्रणा सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

विजय कुमार सिंह यांनी विमानाची गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांबाबत खात्री देताना सांगितले की, “सदर विमानाची देखभाल अत्यंत उच्च दर्जाच्या निकषांनुसार नियमितपणे केली जात होती. आमच्या प्राथमिक निरीक्षणानुसार आणि उपलब्ध माहितीनुसार, विमानात कोणत्याही प्रकारची यांत्रिक अडचण किंवा इंजिनमधील बिघाड नव्हता.” विमानाची सर्व उपकरणे व्यवस्थित कार्यरत होती, असे सांगून त्यांनी तांत्रिक बिघाडाच्या शक्यतांना तूर्तास पूर्णविराम दिला आहे.

VSR Aviation कंपनीचा मालक आणि कार्यालयांची माहिती
अपघातग्रस्त विमान Learjet 45 असून, या विमानाची मालकी VSR Ventures Pvt Ltd या कंपनीच्या ताब्यात आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, VSR Ventures चे मुख्यालय दिल्ली येथे आहे, तर मुंबई, भोपाळ आणि हैदराबाद येथेही कंपनीची कार्यालये आहेत. या कंपनीचे मालक विजय कुमार सिंह हे आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, VSR Ventures खासगी चार्टर सेवांमध्ये सक्रिय आहे आणि त्यांचे विमान वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यरत आहेत.

या Learjet 45 विमानाची किंमत
ज्या अपघातग्रस्त विमानाचा संबंध VSR Ventures Pvt Ltd शी आहे, ते Learjet 45 मॉडेलचे आहे. या विमानाची उत्पादन काळातील किंमत सुमारे १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती, म्हणजेच अंदाजे ८० कोटी भारतीय रुपये. तथापि, सध्या वापरलेल्या Learjet-45 विमानांची किंमत त्याच्या मॉडेल आणि स्थितीनुसार बदलते; अंदाजे २.५ ते ४.५ दशलक्ष डॉलर्स दरम्यान असते.

Learjet 45 च्या सुधारित आवृत्ती 45XR ची किंमत याहून अधिक असण्याची शक्यता आहे, कारण त्यात तांत्रिक सुधारणा, उन्नत इंजिन आणि आधुनिक सुरक्षा उपाय यांचा समावेश असतो. विमानाची उच्च किंमत आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता, या प्रकारच्या विमानांचा अपघात गंभीर आर्थिक तसेच मानवी परिणाम घडवू शकतो.

चार्टर सेवेसाठी या विमानाचा प्रति तास खर्च ३,००० ते ४,५०० अमेरिकन डॉलर्स इतका अपेक्षित केला जातो, जो विमानाच्या मॉडेल, तांत्रिक स्थिती आणि उड्डाणाच्या कालावधीवर अवलंबून बदलतो. यामुळे Learjet 45 हे विमान केवळ उच्च उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी आणि खासगी चार्टर सेवा पुरवणार्‍या कंपन्यांसाठी आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य ठरते.

विमान वाहतूक क्षेत्रात एका विशेष प्रकारच्या विमानाला अनेकदा ‘लॅम्बोर्गिनी’ म्हणूनही संबोधले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे याच्या इंजिनाची क्षमता आणि एरोडायनॅमिक डिझाइन अत्यंत टोकदार आणि गतिमान असणे, ज्यामुळे हे विमान इतर सामान्य व्यावसायिक विमाने गाठू शकत नसलेल्या उंचीवरही सहज उडू शकते. हे विमान जमिनीपासून सुमारे ५१,००० फूट उंचीवर पोहोचण्यास सक्षम आहे, जे पारंपरिक एअरबस किंवा बोईंगसारख्या मोठ्या व्यावसायिक विमाने साधारणपणे गाठू शकत नाहीत.

या विमानाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला लहान धावपट्ट्यांवरूनही सुरक्षित उतरता येणे. यामुळे, मोठ्या विमाने ज्या विमानतळांवर उतरू शकत नाहीत, अशा लहान आणि मर्यादित जागेच्या विमानतळांवर हे विमान सहज वापरले जाते. उदाहरणार्थ, बारामतीसारख्या छोट्या विमानतळांवर हे विमान नियमित सेवा देण्यासाठी आदर्श मानले जाते. त्याची चपळ उड्डाण क्षमता आणि अल्प धावपट्टीवरून उतरता येण्याची क्षमता, व्यवसायिक तसेच खासगी प्रवाशांसाठी हे विमान अत्यंत आकर्षक ठरते.

हे देखील वाचा – Ajit Pawar Death : गोपीनाथ मुंडेंनंतर अजित पवारांच्या अपघातावर संशयाच वादळ

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या