Brain Stroke Symptoms : मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे उद्भवणारी ‘ब्रेन स्ट्रोक’ची समस्या सध्या वेगाने वाढत आहे. रक्ताभिसरण थांबल्याने मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही आणि पेशी मृत होऊ लागतात, ज्यामुळे कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते.
मेंदूतील रक्तवाहिनी फुटणे किंवा रक्त साकळणे अशा दोन कारणांमुळे ही स्थिती निर्माण होते. आपल्या जीवनशैलीत थोडे बदल करून आणि काही धोके ओळखून आपण या संकटापासून दूर राहू शकतो.
ब्रेन स्ट्रोकची पूर्वलक्षणे
- शरीराचा एक भाग किंवा हात-पाय अचानक कमकुवत होणे.
- बोलताना शब्द स्पष्ट न सुचणे किंवा समोरच्याचे बोलणे न समजणे.
- अचानक दृष्टी धुसर होणे किंवा चालताना तोल जाणे.
- कोणत्याही कारणाशिवाय डोकेदुखीचा तीव्र झटका येणे.
आरोग्यावर परिणाम करणारे ‘हे’ ७ मुख्य धोके
- शारीरिक निष्क्रियता: व्यायामाचा अभाव आणि वाढते वजन हे स्ट्रोकसाठी निमंत्रण ठरू शकते. जे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसतात, त्यांच्यामध्ये हा धोका ३ पटीने जास्त असतो.
- मधुमेह: रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण केवळ स्वादुपिंडावर परिणाम करत नाही, तर संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या कमकुवत करते. स्ट्रोकच्या वेळी साखर जास्त असल्यास मेंदूची हानी मोठ्या प्रमाणात होते.
- धूम्रपान: तंबाखूचे सेवन मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा करते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका २ ते ४ पटीने वाढतो.
- कोलेस्ट्रॉलमधील असंतुलन: शरीरातील ‘एलडीएल’ म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ही स्थिती हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसाठी सर्वात जास्त जबाबदार मानली जाते.
- उच्च रक्तदाब: वयानुसार वाढणारा रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील नाजूक रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि त्या फुटण्याची शक्यता निर्माण होते.
- हृदयविकार: हृदयाच्या ठोक्यांची अनियंत्रित गती किंवा झडपांमधील दोषामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. या गुठळ्या रक्ताभिसरणाद्वारे मेंदूपर्यंत पोहोचल्यास स्ट्रोक येतो.
- जुना इतिहास: जर एखाद्या व्यक्तीला यापूर्वी छोटा स्ट्रोक येऊन गेला असेल, तर त्यांना भविष्यात मोठा झटका येण्याचा धोका अधिक असतो. अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहणे अनिवार्य आहे.
काही घटक जसे की वाढते वय, अनुवांशिकता आणि लिंग यावर आपले नियंत्रण नसते, मात्र वरील ७ गोष्टींवर काम केल्यास आपण हा धोका नक्कीच कमी करू शकतो.











