Ajit Pawar Funeral : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व आज कायमचे शांत झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि जनसागराच्या साश्रू नयनांच्या साक्षीने हा जननेता अनंतात विलीन झाला. या दुःखद प्रसंगी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता.
पुत्रांनी पार पाडले अंत्यविधी-
अजित पवार यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सरणावर ठेवल्यानंतर वातावरणातील गांभीर्य अधिकच वाढले. त्यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांनी आपल्या पित्याला मुखाग्नी दिला. ज्या कणखर नेतृत्वाने राज्याला दिशा दिली, ते शरीर पंचतत्त्वात विलीन होत असताना उपस्थित जनसमुदायाने “अजित दादा अमर रहे” अशा घोषणा दिल्या. आपल्या पित्याचा हा अखेरचा प्रवास पाहताना दोन्ही पुत्रांना आपले अश्रू अनावर झाले होते, त्यांच्या या अवस्थेने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले.

आई आणि पत्नीची शोकाकुल अवस्था-
या कठीण प्रसंगी अजित पवार यांच्या मातोश्री आणि पत्नी सुनेत्रा पवार यांची अवस्था अत्यंत हृदयद्रावक होती. आपल्या आयुष्याचा भक्कम आधार आणि राज्याच्या राजकारणाचा कणा असलेला माणूस असा अचानक सोडून गेल्याने दोन्ही माऊली पूर्णतः खचल्या होत्या. सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना सावरून धरले होते. ज्या मातीने या नेत्याला घडवले, त्याच मातीत आज त्यांना अखेरची विदाई देताना कुटुंबाचा शोक अनावर झाला होता.
अवघा महाराष्ट्र हळहळला-
केवळ बारामतीच नव्हे, तर आज अवघा महाराष्ट्र आपल्या या लाडक्या लोकनेत्यासाठी हळहळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जड अंतःकरणाने अजित पवारांना अखेरचा मुजरा केला. शिस्त, धडाडी आणि विकासाचा ध्यास घेतलेला हा ‘प्रशासक’ आता केवळ आठवणींच्या रूपाने महाराष्ट्राच्या मनात जिवंत राहील.
शासकीय मानवंदनेने निरोप-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस दलाने हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अंतिम मानवंदना दिली. तिरंग्यात लपेटलेल्या आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. एक कर्तबगार लोकनेता, खंबीर प्रशासक आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला हा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला असून, राज्याच्या राजकीय इतिहासातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाची सांगता झाली आहे.

स्वगृही अखेरची भेट: भावूक झाला काटेवाडीचा परिसर-
स्व. अजित पवार यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले. ज्या वास्तूत त्यांनी आपल्या जीवनातील अनेक वसंत पाहिले आणि ज्या घरातून त्यांनी जनसेवेचा वसा घेतला, त्याच निवासस्थानी त्यांचे पार्थिव काही काळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. ‘दादां’चे पार्थिव निवासस्थानी येताच उपस्थित ग्रामस्थांचा बांध फुटला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचे पाहण्यासाठी काटेवाडीकरांनी पहाटेपासूनच निवासस्थानाबाहेर अलोट गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरातील रस्ते नागरिकांच्या अथांग गर्दीने ओसंडून वाहत होते.

नाळ मातीशी आणि नाती जनसामान्यांशी-
अजित पवार यांचे काटेवाडीशी असलेले नाते केवळ राजकीय स्वरूपाचे नव्हते, तर ते या मातीचे पुत्र म्हणून प्रत्येक घराघरात स्थिरावले होते. राज्याच्या राजकारणात कितीही मोठी पदे भूषवली असली, तरी अजित पवार हे सण-उत्सवांच्या निमित्ताने आवर्जून आपल्या या मूळ गावी येत असत. दिवाळी असो वा अन्य कोणताही सण, ते आपल्या आप्तेष्टांसोबत आणि ग्रामस्थांसोबत वेळ घालवून जुन्या आठवणींना उजाळा देत. याच जिव्हाळ्यामुळे ग्रामस्थांशी त्यांची एक अतूट नाळ जुळलेली होती. आज आपल्या हक्काचा माणूस कायमचा सोडून जात असल्याची जाणीव प्रत्येकाला व्याकुळ करत होती.

हे देखील वाचा – Ajit Pawar Passes Away : अलविदा दादा; निपचित पडलेले पार्थिव आणि शरद पवारांची ती सुन्न नजर…









