Mumbai Air Pollution News : आर्थिक राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण झाल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारीनुसार, मुंबईतील प्रमुख ४५ वायुगुणवत्ता मापन केंद्रांवर ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ (AQI) १५० च्या पुढे नोंदवण्यात आला आहे. सातत्याने बिघडत चाललेली ही हवेची स्थिती मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे.
प्रदूषणाची तीव्रता आणि क्षेत्रीय आकडेवारी: हवा गुणवत्ता निर्देशांकाचा आढावा घेतला असता, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मुंबईच्या सरासरी निर्देशांकात १५१ ते १२१ अशी मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने १५१ ते २०० दरम्यानचा निर्देशांक हा ‘आरोग्यासाठी घातक’ श्रेणीत मोडतो. मुंबईतील विविध उपनगरांमध्ये प्रदूषणाची पातळी खालीलप्रमाणे नोंदवण्यात आली आहे..
विक्रोळी: १७२ (सर्वात जास्त)
स्वस्तिक पार्क: १६९
वडाळा ट्रक टर्मिनल: १६४
पवई आणि सर्वोदय नगर: १६१
वाळकेश्वर आणि सुभाष नगर: १५८
कुर्ला: १५७
चेंबूर: १५६
भांडुप आणि चांदिवली: १५५
अंधेरी (पूर्व): १५३
अणुशक्तीनगर: १५२
आकडेवारीवरून स्पष्ट होते की, केवळ औद्योगिक पट्टाच नव्हे तर निवासी भागांतील हवेचा दर्जाही कमालीचा खालावला आहे.
तापमानातील बदल आणि हवामान विभागाचा अंदाज: हवेच्या गुणवत्तेसोबतच मुंबईच्या तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सध्या शहर आणि उपनगरांमध्ये किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली असले, तरी थंडीचा जोर ओसरताना दिसत आहे. सांताक्रुझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी किमान तापमान १९ अंश आणि कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मागील दिवसाच्या तुलनेत तापमानात प्रत्येकी एका अंशाची वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता असून पुढील दोन दिवसांत किमान तापमान २० अंशांचा टप्पा ओलांडू शकते.
आरोग्यावर होणारे परिणाम-
हवेचा दर्जा १५० च्या वर गेल्यामुळे श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्ती, लहान मुले आणि ज्येष्ठांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे. हवेतील धुलिकण आणि वाढत्या आद्रतेमुळे वातावरणात धुरक्याचे थर साचत असून, यामुळे दृश्यमानता कमी होण्यासोबतच आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.











