Tejas Express and Humsafar Express new timetable update : येत्या काही दिवसांत रेल्वेने प्रवास करण्याचा बेत आखणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने आपल्या तांत्रिक आणि परिचालकीय (Operational) यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी एकूण १२ महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे रुळांची देखभाल, गाड्यांची वक्तशीरपणा सुधारणे आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. हे नवीन वेळापत्रक शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे.
या बदलामुळे तेजस, हमसफर, अमृत भारत आणि डबल डेकर यांसारख्या प्रमुख गाड्यांसह काही पॅसेंजर ट्रेनच्या वेळेतही फरक पडणार आहे. तरी प्रवाशांनी स्थानकावर जाण्यापूर्वी अधिकृत वेळापत्रक तपासून घ्यावे, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही.
गाड्यांचे सुधारित वेळापत्रक आणि प्रभावी तारखा:
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विविध गाड्यांच्या वेळा खालील तारखांपासून बदलल्या जातील:
३० जानेवारी २०२६ पासून: रोहतक जंक्शन-रेवाडी जंक्शन पॅसेंजर (५४०२०), बालामऊ जंक्शन-शाहजहानपूर जंक्शन पॅसेंजर (५४३२९) आणि बरेली जंक्शन-दिल्ली जंक्शन पॅसेंजर (५४०७५) या गाड्यांच्या वेळेत बदल होईल.
३१ जानेवारी २०२६ पासून: गुवाहाटी-नवी दिल्ली एक्सप्रेस (२२४४९) नवीन वेळेनुसार धावेल.
१ फेब्रुवारी २०२६ पासून: लखनौ जंक्शन-नवी दिल्ली तेजस एक्सप्रेस (८२५०२), बलिया-आनंद विहार सुपरफास्ट एक्सप्रेस (२२४२७) आणि लखनौ जंक्शन-आनंद विहार डबल डेकर एक्सप्रेस (१२५८३) या गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्यात आली आहे.
२ फेब्रुवारी २०२६ पासून: सिलचर-नवी दिल्ली ईशान्य संपर्क क्रांती एक्सप्रेस, गोड्डा-नवी दिल्ली हमसफर एक्सप्रेस (१२३४९) आणि दरभंगा जंक्शन-आनंद विहार अमृत भारत एक्सप्रेस (१५५५७) या गाड्या नवीन वेळापत्रकानुसार मार्गस्थ होतील.
५ फेब्रुवारी २०२६ पासून: आगरतळा-फिरोजपूर कॅन्ट त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेसच्या (१४६१९) वेळेत बदल लागू होणार आहेत.
तात्काळ बदल: काठगोदाम-हावडा जंक्शन बाग एक्सप्रेसच्या (१३०२०) वेळापत्रकात तातडीने बदल करण्यात आला असून, प्रवाशांनी याची त्वरित नोंद घ्यावी.
रेल्वेने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांनी रेल्वेच्या ‘नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम’ (NTES) वर किंवा अधिकृत ॲपवर आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासूनच घरून निघावे, अन्यथा स्थानकावर ताटकळत बसावे लागण्याची शक्यता आहे.











