Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे पर्व आज संपुष्टात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. अत्यंत शोकाकुल वातावरणात, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दादा पंचतत्त्वात विलीन झाले. आज केवळ बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला होता. राज्याच्या विविध भागांतून आलेले कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे पूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते. अजित पवार यांचे पार्थिव बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवताच ग्रामस्थांचा बांध फुटला. लाडक्या दादांना अखेरचे पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
परिसरातील रस्ते जनसागराने भरून गेले होते. यावेळी झालेली अभूतपूर्व गर्दी पोलिसांना सुद्धा नियंत्रित करणे अशक्य झाले होते. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विनंतीनंतर जमाव नियंत्रित झाला. अजित पवार यांना मूळ गावी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या पार्थिवाचे पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांची बहीण सुप्रिया सुळे तसेच सून यांनी अंत्यदर्शन घेतले. याठिकाणी ज्येष्ठ नेते आणि पवार कुटुंबाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेप्रमुख राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, एमआयएम नेते इम्तियाज जलील, तेलगु देसम पार्टीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खा. शाहू महाराज छत्रपती, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या मान्यवरांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, आ. धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांनीही दादांना अखेरचा निरोप दिला.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने पोलीस दलाने हवेत तीन फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अंतिम मानवंदना दिली. त्यानंतर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘अजितदादा अमर रहे’च्या गगनभेदी घोषणा दिल्या. तिरंग्यात लपेटलेल्या पार्थिवाला निरोप देताना हजारो नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. एका कर्तबगार लोकनेत्याच्या जाण्याने राज्याच्या राजकीय इतिहासातील एक अध्याय संपला.माजी खा. इम्तियाज जलील म्हणाले की, कालपर्यंत असणारे दादा आज नाही हे सांगताना मला शब्द सुचत नाही.ते महाराष्ट्रात प्रशासनावर उत्तम पकड असलेले नेते होते. जेव्हा अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हीही त्यांच्यावर टीका केली होती. परंतु भाजपासोबत जाऊनही दादांनी फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा सोडली नव्हती. त्यामुळे कट्टर विरोधक असून आम्ही दादांचा आदर करतो.
शरद पवार गहिवरले
अजित पवार यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणले तेव्हा संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता. अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेल्या चबुतर्यासमोरील मंडपात शरद पवार हे अत्यंत विमनस्क आणि गहिवरलेल्या स्थितीत बसले होते. या ठिकाणी राजकीय नेते आणि मान्यवर त्यांचे सांत्वन करत होते.

बारामतीकर पोरके झाले
अंत्यसंस्कार झाल्यानंतर लोकांनी बारामतीकर पोरके झाल्याची भावना व्यक्त करत सांगितले की, अजित पवार यांच्यासारखा प्रशासनावर पकड असणारा दुर्मीळ नेता होणे नाही. अजित दादांकडे घेऊन गेलेले काम कधी झाले नाही असे होत नसे. ते 100 टक्के काम करून देत असत. त्यांच्यासारखा माणूस राजकारणात होणे शक्य नाही. बारामतीकरांचा देव माणूस हरपल्याचे सांगताना नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.
शिस्तबद्ध नियोजन
अजित पवार यांना निरोप देण्यासाठी हजारो नाही तर लाखो लोक आले होते. परंतु कालपासून सुरू असलेल्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची स्थानिक प्रशासन आणि अजित पवार समर्थकांनी शिस्तबद्ध पद्धतीत आखणी केली होती. त्यासाठी बारामतीकर पोलिसांना मदत करत होते. गर्दीच्या ठिकाणी वाहनांना रस्ता करून देत होते. हा दुखवटा केवळ पवार कुटुंबाचा नव्हता तर बारामतीकरांचा असल्याची भावना या नियोजनातून स्पष्ट झाली.
सुरक्षारक्षक विदीप जाधव
अनंतात विलीन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सुरक्षा अधिकारी (पीएसओ) विदीप दिलीप जाधव यांच्यावरही काल रात्री सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ तरड गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या लहान मुलाने पित्याच्या पार्थिवावर मुखाग्नी दिल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.
पिंकी यांचा संसार अर्ध्यावर मोडला
बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात प्राण गमावलेल्या क्रू अटेंडंट पिंकी माळी यांच्या पार्थिवावर मुंबईत शोकाकुल वातावरणात वरळी येथे अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींवर दुःखाचा डोंगर कोसळला. पिंकी यांचा तीन वर्षांपूर्वी कळवा येथील सोमकरसोबत विवाह झाला होता. पिंकी यांचे पार्थिव वरळीला माहेरी आणल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी सोमकर यांनी पत्नीचे अंतिम दर्शन घेतले. संसार अर्ध्यावर मोडल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते.
हे देखील वाचा –











