Ajit pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar )यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर विमान पुरवणारी व्हीएसआर व्हेंचर्स ही कंपनी वादात सापडली असतानाच आता हा अपघात वैमानिकाच्या चुकीमुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल आल्याचे सांगण्यात येत आहे. हे सत्य आहे का, याची शहानिशा सुरू आहे. त्याचवेळी विमानाच्या वैमानिकाविषयी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अपघातग्रस्त विमानाचे वैमानिक सुमीत कपूर यांना यापूर्वी कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याबद्दल निलंबित केल्याचे उघड झाले आहे. अशी वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या वैमानिकावर अजित पवार यांच्या प्रवासाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी कशी काय सोपवण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या वैमानिकासह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी विमान प्रवास केला असल्याने या माहितीने खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांच्या अपघातानंतर व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे वैमानिक सुमीत कपूर हे अनुभवी वैमानिक असून, त्यांना 15,000 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. मात्र, याच सुमीत कपूर यांनी भूतकाळात मद्यपान करून ड्युटीवर गेले आणि सुरक्षा नियमांचे दोन वेळा उल्लंघन केल्याचे सांगितले जात आहे. हवाई खात्यांच्या नियमानुसार वैमानिकांना मद्यपान करून ड्युटीवर जाता येत नाही. यासाठी प्रत्येक उड्डाणापूर्वी वैमानिकांची चाचणी केली जाते. त्यात दोषी सापडल्यास कारवाई म्हणून वैमानिकाला उड्डाण करण्यापासून रोखले जाते. सुमीत कपूर हे 13 मार्च 2010 रोजी दिल्ली विमानतळावर दिल्ली-बंगळुरू विमानाच्या उड्डाणापूर्वी झालेल्या चाचणीत मद्यपान केल्याचे आढळले होते. सात वर्षांनंतर 7 एप्रिल 2017 रोजी त्यांनी तीच चूक पुन्हा केली होती. दिल्लीहून गुवाहाटीला जाणार्या विमानाच्या उड्डाणापूर्वी त्यांनी ड्युटीदरम्यान मद्यपान केल्याचे निदर्शनास आले होते. दुसर्यांदा पकडल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने त्याच्या बाबतीत कठोर भूमिका घेतली होती. 24 एप्रिल 2017 रोजी अधिकृत आदेश जारी करीत सुमीत यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. कोणत्याही व्यावसायिक पायलटसाठी तीन वर्षांचे निलंबन हे त्याची कारकीर्द संपल्यासारखे असते. मात्र तरीही सुमित व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीत दाखल होऊन व्हीआयपी विमाने उडवू लागले. याशिवाय 2009 मध्येही सुमीत यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली होती. त्यावेळी त्यांना तीन महिन्यांसाठी विनावेतन उड्डाणापासून दूर ठेवण्यात आले होते. ही कारवाई का करण्यात आली होती, याची माहिती नाही.
बारामतीच्या अपघातानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची सुरक्षा अशा वैमानिकाकडे सोपवण्यात कशी आली? ज्या पायलटच्या कामाबाबत आधीच संशय होता, त्यांच्यावर इतकी मोठी जबाबदारी कशी देण्यात आली? कंपनीने कॅप्टन सुमीतची पार्श्वभूमी योग्यरित्या तपासली नव्हती का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. बारामती अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात अपघातात वैमानिकाचीच चूक असल्याचे सांगितले जात आहे. पण नागरी विमान वाहतूक संचालनालय या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
बारामती अपघातातील लिअरजेट-45 विमान आणि ते चालवणार्या कंपनीबद्दलचा तपशीलही खळबळजनक आहे. हे विमान केवळ अजित पवारच नव्हे, यापूर्वी देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी वापरले होते. गेल्या वर्षीच्या बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांना सेवा दिली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी पाटण्याला जाण्यासाठी याच विमानाचा वापर केला होता. विशेष म्हणजे, बारामतीच्या अपघातात जीव गमावलेले कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी यांनीच यावेळी वैमानिक म्हणून काम पाहिले होते.
28 जानेवारी रोजी या विमानाचे वेळापत्रक अत्यंत व्यग्र होते. अजित पवारांना बारामतीत सोडल्यानंतर हे विमान तेलंगणातील शमसाबाद विमानतळावरून आंध्र प्रदेशचे प्रसिद्ध व्यापारी महेश कुमार रेड्डी यांना घेऊन पाटण्याला जाणार होते. बारामतीहून निघून सकाळी साडेदहा वाजता हे विमान पाटण्याला उतरणे अपेक्षित होते. रात्री साडेनऊ वाजता पुन्हा पाटण्याहून उड्डाण करणार होते. मात्र, बारामतीत झालेल्या भीषण अपघातामुळे महेश रेड्डी यांना दुसर्या चार्टर्ड विमानाने पाटण्याला जावे लागले.
हे देखील वाचा –
अलविदा दादा : उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन; जय आणि पार्थ पवारांनी दिला मुखाग्नी..











