Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र अजूनही धक्क्यात असतानाच, आता या दुर्घटनेबाबत एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर येत आहे. ज्या विमानाने अजितदादांचा बळी घेतला, त्या विमानाचे सारथ्य करण्यासाठी मूळतः कॅप्टन सुमित कपूर यांची नियुक्ती करण्यात आलीच नव्हती.
मात्र, मुंबईतील एका ‘ट्रॅफिक जाम’ने आणि नियतीच्या क्रूर खेळाने शेवटच्या क्षणी सूत्रे बदलली आणि महाराष्ट्राने आपला मोठा नेता गमावला, असा दावा कॅप्टन कपूर यांच्या मित्रांनी केला आहे.
ट्रॅफिक जाम आणि ऐनवेळी बदललेला वैमानिक
रिपोर्टनुसार, अजित पवारांच्या बारामती उड्डाणासाठी कंपनीने दुसऱ्या एका वैमानिकाची निवड केली होती. मात्र, तो वैमानिक मुंबईतील रस्ते वाहतूक कोंडीत अडकल्याने त्याला विमानतळावर पोहोचायला उशीर होत होता. अजित पवार हे आपल्या वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध होते आणि त्यांना बारामतीतील नियोजित प्रचार सभांसाठी वेळेत पोहोचायचे होते.
त्यामुळे कंपनीने वेळ न घालवता तातडीने 16500 तासांहून अधिक उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या कॅप्टन सुमित कपूर यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. या क्षेत्रात दिग्गज मानले जाणारे कपूर त्या दिवशी अजितदादांच्या विमानाचे सारथ्य करण्यासाठी शेवटच्या क्षणी विमानामध्ये बसले.
अनुभव की तांत्रिक बिघाड? मित्रांचा संशय
कपूर यांचे मित्र जी. एस. ग्रोवर यांनी आठवण सांगितली की, काही काळापूर्वी हाँगकाँगहून परतल्यानंतर कपूर यांनी त्यांच्याशी दीर्घ संवाद साधला होता आणि त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचा मोलाचा सल्ला दिला होता. तसेच, दुसरे मित्र नरेश तनेजा यांनी ही घटना पचवणे कठीण असल्याचे सांगितले.
कपूर हे अत्यंत शिस्तप्रिय आणि अनुभवी वैमानिक होते, त्यामुळे त्यांच्याकडून केवळ चुकीच्या अंदाजामुळे अपघात होणे अशक्य असल्याचे त्यांच्या मित्रांचे म्हणणे आहे. 3 किमीची कमी दृश्यमानता आणि विमानात झालेला तांत्रिक बिघाड यांमुळेच त्यांचा प्रदीर्घ अनुभवही तोकडा पडला असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सखोल चौकशीची मागणी
कॅप्टन कपूर यांच्या मित्रांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ऐनवेळी वैमानिक का बदलण्यात आला? विमानाची तांत्रिक तपासणी पूर्ण झाली होती का? आणि धुक्यासारख्या परिस्थितीत लँडिंगचा दबाव वैमानिकावर होता का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आता गरजेचे झाले आहे. जर तो दुसरा वैमानिक ट्रॅफिकमध्ये अडकला नसता, तर कदाचित आज चित्र वेगळे असते का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.











