Home / महाराष्ट्र / Sunetra Pawar : अजितदादांच्या जाण्याने रिक्त झालेले उपमुख्यमंत्रिपद सुनेत्रा वहिनींना द्या; नरहरी झिरवाळ यांची मागणी

Sunetra Pawar : अजितदादांच्या जाण्याने रिक्त झालेले उपमुख्यमंत्रिपद सुनेत्रा वहिनींना द्या; नरहरी झिरवाळ यांची मागणी

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी...

By: Team Navakal
Sunetra Pawar
Social + WhatsApp CTA

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.

मात्र, अंत्यसंस्काराच्या विधींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांनी राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. अजितदादांच्या निधनानंतर आता पक्षाची धुरा कोणाकडे जाणार आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबत नेत्यांनी आपली भूमिका मांडली.

सुनेत्रा वहिनींकडे नेतृत्वाची धुरा आणि उपमुख्यमंत्रिपदाची मागणी

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या प्रसंगी माध्यमांशी बोलताना एक मोठी मागणी केली. झिरवाळ म्हणाले की, “अजितदादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर खासदार सुनेत्रा पवार यांनी आता राष्ट्रवादीची सूत्रे आपल्या हातात घ्यावीत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन राज्याचे उपमुख्यमंत्रिपद देण्यात यावे. सुनेत्रा वहिनींच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत आम्ही लवकरच वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार आहोत.” त्यांच्या या विधानामुळे सुनेत्रा पवार आता सक्रिय राजकारणात अजितदादांची जागा घेणार असल्याची शक्यता बळकट झाली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

अजित पवारांच्या निधनानंतर विखुरलेला पक्ष पुन्हा संघटित व्हावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. नरहरी झिरवाळ यांनी ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे’ ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. “पक्षाचे दोन गट राहणे कोणालाही मान्य नाही. सर्वांनी एकत्र यावे, हीच सर्वसामान्यांची आणि आमचीही इच्छा आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

दुसरीकडे, माजी मंत्री नवाब मलिक यांनीही जनतेच्या भावनेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही जनतेची इच्छा आहे. वरिष्ठ नेते यावर काय निर्णय घेतात हे पहावे लागेल, मात्र सध्याची परिस्थिती पाहता एकजुटीशिवाय पर्याय दिसत नाही.”

पवारांच्या उपस्थितीत होणार निर्णयाची प्रतीक्षा

अजित पवारांच्या जाण्याने शरद पवार यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये नेत्यांनी व्यक्त केलेल्या या इच्छा आगामी काळात प्रत्यक्षात येतात का, हे महत्त्वाचे ठरेल. सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले तर त्याला भाजप आणि इतर मित्रपक्षांचा पाठिंबा मिळेल का, यावरही राजकीय गणितं अवलंबून असतील.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या