Hutatma Smruti Day : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात वीरांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आज देशभरात ‘हुतात्मा दिन’ पाळला जात आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य शासनाने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना विशेष आदेश निर्गमित केले आहेत. आज सकाळी ठीक ११ वाजता राज्यातील सर्व कामकाज थांबवून दोन मिनिटांचे मौन पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे.
स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सकाळी ११ ते ११:०२ या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या स्थानी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करायची आहे. केवळ कार्यालयेच नव्हे, तर शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांमध्येही या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाने या संदर्भात अत्यंत गंभीर भूमिका घेतली असून, या दोन मिनिटांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हालचाल किंवा कामकाजाचा व्यत्यय येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासकीय प्रमुखांना दिले आहेत. हा केवळ एक उपचार नसून, राष्ट्रनिर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे एक पवित्र कर्तव्य आहे, अशी भावना यामागे व्यक्त करण्यात आली आहे.
कशी देतात आदरांजली?
१. आज सकाळी सुमारे १०:५९ ते ११ दरम्यान एक मिनिट इशारा भोंगा वाजवण्यात येणार आहे.
२. इशारा भोंगा संपल्यावर सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय आणि संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक हे २ मिनिटे मौन पाळणार आहेत.
३. सकाळी ११:०२ ते ११: ०३ वाजेपर्यंत मौन संपल्यासंबंधी इशारा भोंगा देखील वाजवला जाणार आहे.
४. ज्याठिकाणी भोंगा नसेल, त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ते निर्देश द्यावेत अश्या सूचना देखील जरी करण्यात आल्या आहेत.
आज सकाळी ११ वाजता संपूर्ण महाराष्ट्र दोन मिनिटांसाठी स्तब्ध होणार; प्रशासनाचे काटेकोर आदेश
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतीकारकांच्या आणि राष्ट्रपुरुषांच्या महान बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आज, शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी देशभर ‘हुतात्मा दिन’ पाळण्यात येत आहे. या औचित्याने संपूर्ण महाराष्ट्रात सकाळी ठीक ११ वाजता दोन मिनिटांचे मौन पाळून हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
इशारा भोंग्याद्वारे सूचना शासकीय आदेशानुसार, मौन पाळण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता राहावी यासाठी विशेष वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी १०:५९ ते ११:०० या एका मिनिटाच्या कालावधीत प्रथम ‘इशारा भोंगा’ वाजविला जाईल. या भोंग्याचा आवाज होताच नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या स्थानी स्तब्ध व्हायचे आहे. त्यानंतर सकाळी ११:०० ते ११:०२ या दोन मिनिटांच्या कालावधीत सर्वांनी मौन पाळून क्रांतीकारकांचे स्मरण करायचे आहे. श्रद्धांजलीचा हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, सकाळी ११:०२ ते ११:०३ या वेळेत पुन्हा एकदा भोंगा वाजवून मौन संपल्याचा इशारा दिला जाईल.
सर्व स्तरांवर अंमलबजावणी या उपक्रमात राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, निमशासकीय आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि सार्वजनिक उपक्रम यांनी सहभागी होणे अनिवार्य आहे. अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या जागी शांत राहून हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी भोंग्याची सोय उपलब्ध नसेल, तिथे संबंधित संस्थाप्रमुखांनी वेळेचे योग्य नियोजन करून हा कार्यक्रम गांभीर्याने पार पडेल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डिजिटल साक्षांकित आदेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात अधिकृत परिपत्रक निर्गमित केले असून, ते शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे (संकेतांक: २०२६०१२९१२५९०५३००७). महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने काढण्यात आलेले हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित आहे. हा दिवस केवळ एक उपचार न राहता, हुतात्म्यांच्या बलिदानाचा आदर राखणारा एक गंभीर व पवित्र प्रसंग म्हणून पाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे देखील वाचा – Mumbai Traffic : मुंबईकरांचा प्रवास आता सुसाट होणार! वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय; ‘या’ वेळेत अवजड वाहनांना शहरात एन्ट्री बंद











