PT Usha Husaband Death : भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष आणि राज्यसभेच्या खासदार पी.टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. शुक्रवारी रात्री पेरुमलपुरम येथील राहत्या घरी चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ही दुर्दैवी घटना अशा वेळी घडली, जेव्हा पी.टी. उषा या आपल्या मतदारसंघातून परतत होत्या आणि त्या घरी उपस्थित नव्हत्या. पतीच्या अचानक निधनाने पी.टी. उषा यांना मोठा धक्का बसला आहे.
व्ही. श्रीनिवासन यांचा जन्म कुट्टिक्काड पोन्नानी येथील वेंगाली थारवाद येथे नारायणन आणि सरोजिनी यांच्या घरी झाला. ते सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) मध्ये उपअधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. १९९१ साली पी.टी. उषा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. हे दोघेही नात्याने आप्त होते. या दाम्पत्याला उज्ज्वल नावाचा एक मुलगा आहे.
श्रीनिवासन हे स्वतःही एक उत्कृष्ट खेळाडू होते. तरुणपणी त्यांनी कबड्डी खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली होती. खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अधिकारी म्हणून देशसेवा केली. निवृत्तीनंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ पी.टी. उषा यांच्या क्रीडा आणि राजकीय कारकिर्दीसाठी तसेच ‘उषा स्कूल ऑफ ॲथलेटिक्स’च्या व्यवस्थापनासाठी समर्पित केला होता.
पी.टी. उषा यांच्या यशामागे श्रीनिवासन यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मानले जाते. ट्रॅकवरील कामगिरीपासून ते प्रशासकीय जबाबदाऱ्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर उषा यांना साथ दिली. ‘पय्योली एक्सप्रेस’ म्हणून पी.टी. उषा यांनी जागतिक स्तरावर नाव कमावले, त्या यशामागे श्रीनिवासन यांनी पडद्यामागे राहून घेतलेली मेहनत आणि दिलेली प्रेरणा महत्त्वाची ठरली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, पी.टी. उषा आणि कुटुंबीयांना सांत्वन केले आहे.











