Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेतृत्व आता कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आता या पदासाठी अजितदादांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, सत्ताधारी महायुतीतील हालचालींना वेग आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
या सर्व राजकीय घडामोडींवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही सरकार आणि भारतीय जनता पक्ष म्हणून खंबीरपणे उभे आहोत. अजितदादांचे कुटुंब आणि त्यांचा पक्ष या कठीण काळात जो निर्णय घेईल, त्याला आमचे पूर्ण समर्थन असेल.”
उपमुख्यमंत्रिपदाच्या प्रस्तावाबाबत विचारले असता फडणवीसांनी सांगितले की, “राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्याशी दोन वेळा चर्चा केली आहे. त्यांनी त्यांच्या पर्यायांबाबत विचारविनिमय केला असला, तरी अंतिम निर्णय हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”
उद्याच होणार सत्तेचे हस्तांतरण?
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपल्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी अधिकृत निवड केली जाण्याची शक्यता आहे.
- साधेपणाने शपथविधी: अजितदादांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा असल्याने कोणताही मोठा सोहळा न करता, अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी पार पडेल.
- वेळ: उद्या सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा सोहळा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
- मंत्रिमंडळ प्रवेश: विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाईल आणि त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची चिन्हे आहेत.
अजितदादांच्या अकाली जाण्याने पोरक्या झालेल्या राष्ट्रवादीला सावरण्यासाठी आणि महायुतीतील ताळमेळ कायम ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.












