Sharad Pawar On Sunetra Pawar And Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार आज सायंकाळी ५ वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्याच्या वाटायला येणार आहे. या विशेष सोहळ्यासाठी त्या बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत.
विधीमंडळ पक्षाची बैठक आणि गटनेतेपदी निवड शपथविधीपूर्वीच्या औपचारिक प्रक्रियेचा भाग म्हणून, आज दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व आमदारांच्या संमतीने सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी अधिकृत निवड केली जाईल. त्यानंतर सायंकाळी राजभवनात राज्यपाल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. एका अत्यंत कठीण प्रसंगात पक्षाची आणि राज्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे.
शरद पवार यांच्याकडून अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला. शरद पवार अत्यंत भावूक होत म्हणाले की, “अजित पवार हे जनसामान्यांशी नाळ जोडलेले आणि अहोरात्र कष्ट करणारे एक कर्तृत्वान नेतृत्व होते. संघटनेच्या बांधणीत आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या कामाची पद्धत शिस्तबद्ध होती; पहाटेपासूनच त्यांचा जनसंपर्क सुरू व्हायचा. आज जर अजित पवार आपल्यात असते, तर ते घरी न बसता जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात कार्यरत दिसले असते.”
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांकडून ‘त्या’ गुप्त चर्चेचा उलगडा; राजकीय वर्तुळात खळबळ-
गेल्या काही काळापासून राज्यातील राजकीय वातावरणात सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्णविराम देत एक मोठी माहिती उघड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याबाबत गेल्या चार महिन्यांपासून पडद्यामागे अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू होत्या, असा खळबळजनक खुलासा पवारांनी केला आहे. या चर्चेची धुरा स्वतः दिवंगत नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनी समर्थपणे सांभाळली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१२ तारखेचा ‘तो’ मुहूर्त आणि नियोजित मनोमिलन शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी एकत्र काम करण्याबाबत पूर्णपणे एकमत झाले होते. या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करण्यासाठी खुद्द अजित पवार यांनीच १२ तारीख निश्चित केली होती. दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली होती आणि विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि ही महत्त्वाची घोषणा होण्यापूर्वीच अजित पवार यांच्या निधनाची दुर्दैवी घटना घडली. यामुळे केवळ कुटुंबच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातील एक मोठे नियोजित परिवर्तन अधांतरी राहिले आहे.
अजितदादांची ‘ती’ इच्छा पूर्ण होणार? पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार भावूक-
शरद पवार म्हणाले की, “दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येऊन जनसेवेचे कार्य करावे, ही अजितदादांची तीव्र इच्छा होती. त्यांची ही अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमची आणि कार्यकर्त्यांची देखील प्रामाणिक भावना आहे.” पवारांच्या या विधानामुळे आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादीचे गट अधिकृतपणे एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. सत्तेच्या राजकारणापेक्षा पक्षसंघटन आणि कार्यकर्त्यांची एकजूट महत्त्वाची असल्याचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न पवारांनी केला आहे.
राजकीय भविष्याकडे सर्वांचे लक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. या नवीन जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर, शरद पवारांनी विलीनीकरणाबाबत केलेले भाष्य अत्यंत कळीचे मानले जात आहे.
“राजकारण आणि कुटुंब या दोन भिन्न गोष्टी”; सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीवर शरद पवारांची स्पष्टोक्ती-
महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज शपथ घेणार आहेत. या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नमूद केले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची माहिती त्यांना सकाळी वृत्तपत्रांतून कळाली. “अजित पवार हे पक्षाची सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळत होते, परंतु त्यांच्या पश्चात कोणीतरी नेतृत्व करण्यासाठी पुढे येणे आवश्यक होते; त्यातूनच त्यांच्या पक्षाने हा निर्णय घेतला असावा,” असे मत पवारांनी व्यक्त केले.
राजकीय मार्ग वेगळे, पण कौटुंबिक नाते कायम –
सुनेत्रा पवार यांच्या निवडीबाबत अधिक भाष्य करताना शरद पवार यांनी राजकारण आणि कौटुंबिक संबंध यांतील सीमारेषा अधिक ठळक केल्या आहेत. ते म्हणाले की, “आमचा राजकीय मार्ग पूर्णपणे वेगळा आहे, परंतु परिवार म्हणून आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत. संकटकाळात कुटुंबाला साथ देणे हे आमचे कर्तव्य आहे, मात्र राजकीय निर्णय हे पक्षीय स्तरावर घेतले जातात.” पवारांच्या या विधानामुळे, राजकीय मतभेद असले तरी पवार कुटुंबातील वैयक्तिक जिव्हाळा कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधी सोहळ्यावर विचारले असता मला माहिती नाही, मी सकाळी वाचलं, असं शरद पवार म्हणाले. पक्षीय स्वायत्ततेचा आदर दुसऱ्या गटाच्या अंतर्गत निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्यास शरद पवारांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी सांगितले की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि पक्षाचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांचाच आहे. “त्यांच्या पक्षाने जो काही निर्णय घेतला आहे, त्याची प्रचीती आता दिसत आहे. तो त्यांचा अंतर्गत अधिकार असल्याने आम्ही त्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली तटस्थ भूमिका मांडली.
नेतृत्वातील बदलावर भाष्य अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीला शरद पवारांनी एका बाजूला ‘पक्षाचा अधिकार’ म्हटले असले तरी, दुसऱ्या बाजूला त्यांनी अजित पवारांच्या कर्तृत्वाची उणीव भासत असल्याचेही सूचित केले. आता हा नवीन राजकीय प्रवास नेमके कोणते वळण घेतो आणि दोन्ही गटांतील संबंध भविष्यात कसे राहतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
हे देखील वाचा – Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६; भारताच्या आर्थिक महासत्तेचा नवा आराखडा












