Anjali Damania Reaction On Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या वेगवान घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत परखड शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही प्रादेशिक पक्ष संपुष्टात आणण्यासाठी एक ‘गलिच्छ षड्यंत्र’ रचत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा ज्या घाईघाईने उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी उरकला गेला, त्यावरून दमानिया यांनी सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संयम आणि मानुसकीचा अभाव-
अंजली दमानिया यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मी गेली १५ वर्षे अजित पवार यांच्या राजकीय धोरणांविरोधात संघर्ष केला आहे. मात्र, ज्या दुर्दैवी पद्धतीने त्यांचा अपघाती मृत्यू झाला, त्याने संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे मलाही अतीव दुःख झाले. परंतु, अस्थी विसर्जनाचा विधी पार पडत नाही तोच सर्व नेतेमंडळी शपथविधीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाली, हे पाहून धक्का बसला. या कृतीतून कुटुंबीयांच्या भावना किंवा सोबत काम केलेल्या सहकाऱ्यांचा जिव्हाळा कुठेच दिसून आला नाही. सत्ता आणि स्वार्थ हेच सध्याच्या राजकारणाचे एकमेव सत्य उरले आहे का?” असा प्रश्न त्यांनी विचारला. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या याचा आनंद सर्वांनाच असता, पण त्यासाठी थोडा संयम राखणे आवश्यक होते, असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेला संपवण्याचा कट?
दमानिया यांच्या मते, या सर्व घडामोडींमागे भाजपाची एक दूरगामी रणनीती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे आता स्पष्ट झाले असून, शरद पवार यांनीही या शपथविधीबाबत कल्पना नसल्याचे जाहीर केले आहे. सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपद देऊन पुढे त्यांना पक्षाचे ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ करण्याचा डाव आखला जात आहे. राजकारणाचा फारसा अनुभव नसल्याने सुनेत्रा पवार यांना नियंत्रित करणे सहज शक्य होईल, असा कयास त्यांनी वर्तवला. तसेच, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारखे नेते भाजपात विलीन होण्यास उत्सुक असून, राष्ट्रवादी संपवल्यानंतर भाजपाचा पुढचा रोख एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर असेल, असा दावाही त्यांनी केला.
सत्ताकेंद्रीकरणावर टीका-
राज्यातील महत्त्वाचे ‘वित्त खाते’ भारतीय जनता पक्षाने स्वतःकडेच ठेवल्याचा संदर्भ देत दमानिया यांनी सत्तेच्या केंद्रीकरणावर टीका केली. भाजपाला भविष्यात कोणत्याही प्रादेशिक मित्रपक्षाची गरज उरू नये, अशा पद्धतीने सध्या राजकीय पट मांडला जात आहे. “एकदा राष्ट्रवादी काँग्रेस नामशेष झाली की, भाजपाला शिंदे गटाचीही आवश्यकता राहणार नाही आणि मग त्यांनाही बाजूला सारले जाईल,” असा इशारा दमानिया यांनी दिला. एकूणच, हा सर्व प्रकार लोकशाहीला घातक असून महाराष्ट्रातील प्रादेशिक अस्मिता पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.












