मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाने नेमणुकींचा धडाका लावला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर तिसर्याच दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर टीका झाल्यानंतर हे पद किती दिवस रिकामे ठेवायचे असा युक्तिवाद तटकरेंपासून भुजबळांपर्यंत सर्व नेत्यांनी केला. उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी समारंभ झाल्यानंतर आता पुढच्या तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांची बीड आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही नेमणूक करण्यात आली.
प्रशासनाने प्रचंड वेग दाखवत आज याबाबतचे परिपत्रकही जारी केले. पालकमंत्री इतक्या घाईने नेमण्यामागे कोणती मजबुरी होती याबाबत नेते मात्र मौन पाळून आहेत. दरम्यान, सोमवारी रोहित पवार यांची विलीनीकरणाबाबत पत्रकार परिषद होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आज अचानक शरद पवार यांनी आपला दिल्ली दौरा रद्द करून बारामतीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यातच प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची बंद दाराआड भेट घेतली. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या सकाळी ८ वाजताच्या सुमारास बारामतीतील सहयोग सोसायटी या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. या घडामोडींमुळे पुढे काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजित पवार यांचे कोणतेही दशक्रिया विधी होणार नाही, असे आज त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी सांगितले. सर्व विधी 30 जानेवारीला पार पडले असल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली. सुनेत्रा पवार या सोमवारी मुंबईला येणार असून, त्याच दिवशी पदग्रहण करतील असे सांगण्यात येते. अजित पवार यांचे कोणतेही विधी होणार नाहीत असे असताना शरद पवार यांनी आज अचानक आपला दिल्ली दौरा रद्द केला. ते मुंबईत आले होते आणि येथून दोन दिवसांसाठी दिल्लीला जाऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार होते. मात्र त्यांनी दिल्लीला जाणे रद्द केले असून, ते पुन्हा बारामतीला जाणार आहेत अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार की नाही याबाबत आजही चर्चा सुरू राहिली. संजय राऊत यांनी आज संशय व्यक्त केला की, अजित पवार हे मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याने काही घडवले का? आज अजित पवार गटाचे भोसरीचे आमदार विलास लांडे यांनी जाहीरपणे सांगितले की, विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याचे स्वत: अजित पवार यांनीच मला सांगितले होते. अजित पवार हे कधीही खोटे बोलायचे नाहीत. मी त्यांचाच कार्यकर्ता असल्याने मीही खोटे बोलू शकत नाही. या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांना माहिती होते की नाही हे मात्र मला माहीत नाही. विलास लांडगे यांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ माजली आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची बंद दाराआड भेट घेतली. यावेळी याच विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. सुनेत्रा पवार याही लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट
घेणार आहेत.
सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष
मी स्पर्धेत नाही! प्रफुल्ल पटेल
आज अजित पवार यांच्या दिल्लीतील शोकसभेत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार आपल्यात नाहीत, यावर आजही विश्वास बसत नाही. त्यांचा आवाज अजूनही कानात घुमतो. काहींना वाटते की, आम्ही शपथविधीबाबत घाई केली, पण आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. आम्हाला ठराविक प्रक्रियेतून जावेच लागते. सर्वांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आले आहेत. काम करत राहणे आणि पुढे जात राहणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सुनेत्रा पवार यांना सक्षम नेता म्हणून पुढे आणायचे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे.
शोकसभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून अजितदादांच्या निधनानंतर पुढील वाटचाल, नेतृत्व आणि प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मी पार पाडत आहे. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मी असणार नाही. अन्य योग्य व्यक्ती असेल. काही माध्यमांत उलटसुलट बातम्या चालवल्या जात आहेत, त्यात तथ्य नाही. मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नाही.
चर्चा सुरू आहे, मी गांभीर्याने घेतो
अजितदादांनी सांगितले होते
अजित पवारांचे विश्वासू सहकारी आणि भोसरीचे आमदार विलास लांडे आज म्हणाले की, मी, अजित गवाणे आणि नाना काटे अजित पवारांसोबत एका वाहनातून प्रवास करत होतो. त्यावेळी सहज चर्चा सुरू असताना मी अजितदादांना सांगितले की, पवार साहेबांचे वय झाले आहे, ते थकले आहेत आणि सध्याच्या घडामोडी गांभीर्याने घ्यायला हव्यात. यावर अजितदादांनी, चालल्या आहेत आमच्या सर्व गोष्टी, मी त्यावर विचार करत आहे, असे स्पष्टपणे सांगितले होते. या विलीनीकरणाबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना माहिती होती की नाही याबाबत मला माहिती नाही. मात्र, अजितदादांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. सध्या राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहता मनाला फार वेदना होतात.
हे देखील वाचा –
पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; उड्डाणाआधीच धोका टळला
व्यापार करारावरून संसदेत वादळ; ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप..









