Yamaha EC-06 : दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी यामाहाने अखेर भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत अधिकृत प्रवेश केला आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘EC-06’ भारतात लाँच केली आहे.
या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.67 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. प्रामुख्याने शहरातील दैनंदिन प्रवास आणि वापराचा विचार करून यामाहाने ही स्कूटर डिझाइन केली आहे.
दमदार बॅटरी आणि परफॉर्मन्स
यामाहा EC-06 मध्ये 4kWh क्षमतेचा फिक्स्ड बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 169 किमीपर्यंतचा प्रवास करू शकते. यामध्ये आयपीएम-एसएम (IPMSM) इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे, जी 6.7kW ची कमाल पॉवर आणि 26Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरचा टॉप स्पीड 79 किमी प्रति तास इतका असून शहरात फिरण्यासाठी हा वेग पुरेसा आहे.
विविध रायडिंग मोड्स
ग्राहकांच्या सोयीसाठी यामाहाने यात तीन वेगवेगळे रायडिंग मोड्स दिले आहेत. यामध्ये ‘इको’, ‘स्टँडर्ड’ आणि ‘पॉवर’ मोडचा समावेश आहे, ज्याचा वापर करून चालक गरजेनुसार रेंज किंवा स्पीड निवडू शकतात. विशेष म्हणजे अरुंद पार्किंगमध्ये सोयीचे व्हावे म्हणून यात ‘रिव्हर्स मोड’ची सुविधाही देण्यात आली आहे.
आधुनिक फीचर्स आणि हार्डवेअर
या स्कूटरमध्ये फुल एलईडी लाईटिंग आणि कनेक्टिव्हिटी फीचर्ससह कलर एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते. सीटखाली 24.5 लिटरची मोठी स्टोअरेज जागा देण्यात आली असून सामान ठेवण्यासाठी ती सोयीची आहे.
- हार्डवेअर: स्कूटरला स्टील फ्रेम असून समोर टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ड्युअल शॉक ॲब्जॉर्बर दिले आहेत.
- ब्रेकिंग: सुरक्षिततेसाठी दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स आणि कॉम्बी ब्रेक सिस्टम (CBS) मिळते.
- चार्जिंग: घरगुती चार्जरने बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 8 तास लागतात. यामाहा बॅटरीवर 3 वर्षे किंवा 30,000 किमीची वॉरंटी देत आहे.
ही स्कूटर सुरुवातीला यामाहाच्या निवडक ‘ब्लू स्क्वेअर’ (Blue Square) डीलरशिप्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.









