EPF Withdrawal Rules: जर तुम्ही खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल, तर तुमच्या पगारातील ठराविक हिस्सा दरमहा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPF) जमा होत असेल. इतकीच रक्कम तुमच्या कंपनीकडूनही जमा केली जाते. निवृत्तीच्या वेळी ही मोठी रक्कम व्याजासह मिळते. मात्र, अनेकांच्या मनात शंका असते की, निवृत्तीआधीच नोकरी सोडली किंवा बदलली, तर या जमा पैशांचे काय होते?
निवृत्तीपूर्वी किती पैसे काढता येतात?
ईपीएफओच्या नियमांनुसार, वयाची 58 किंवा 60 वर्षे पूर्ण झाल्यावर कर्मचारी आपली पूर्ण रक्कम काढू शकतो. मात्र, त्याआधी नोकरी सोडल्यास काही अटी लागू होतात:
- एक महिन्यानंतर: नोकरी सोडल्याला एक महिना पूर्ण झाल्यास, कर्मचारी आपल्या खात्यातील 75 टक्के रक्कम काढू शकतो.
- दोन महिन्यांनंतर: जर कर्मचारी दोन महिन्यांनंतरही बेरोजगार असेल, तर तो उरलेली 25 टक्के रक्कमही काढून खाते पूर्णपणे बंद करू शकतो.
- कायमचे परदेशात स्थायिक झाल्यास: अशा परिस्थितीत वयाची अट न ठेवता पूर्ण रक्कम काढता येते.
नोकरी बदलल्यास काय करावे?
तुम्ही एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरीला लागलात, तर जुना पीएफ बॅलन्स नव्या कंपनीकडे ट्रान्सफर करणे सर्वात फायदेशीर ठरते. यासाठी तुमचा युएएन (UAN) क्रमांक तोच राहतो, फक्त तो नव्या एम्प्लॉयरकडे ॲक्टिव्ह करावा लागतो.
पीएफच्या पैशांवर टॅक्स लागतो का?
पैसे काढताना त्यावर कर लागेल की नाही, हे तुम्ही किती वर्षे नोकरी केली आहे यावर अवलंबून असते.
- जर तुम्ही सलग 5 वर्षे नोकरी करण्यापूर्वी पीएफचे पैसे काढले, तर त्यावर टॅक्स द्यावा लागतो. ही रक्कम ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास टीडीएस (TDS) देखील कापला जातो.
- सलग 5 वर्षांच्या सेवेनंतर (नोकरी बदलली तरी पीएफ ट्रान्सफर केला असेल तर) पैसे काढल्यास त्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. ईपीएफओचा मुख्य उद्देश रिटायरमेंटसाठी मोठा निधी तयार करणे हा असल्याने, लवकर पैसे काढण्याला प्रोत्साहन दिले जात नाही.
पेन्शनचे (EPS) नियम काय आहेत?
ईपीएफ खात्यासोबतच तुमची काही रक्कम पेन्शन योजनेत (EPS) जमा होते. याचे नियम पीएफपेक्षा थोडे वेगळे आहेत:
10 वर्षांपेक्षा जास्त सेवा: जर तुम्ही किमान 10 वर्षे पेन्शन फंडात योगदान दिले असेल, तर तुम्ही ही रक्कम मधेच काढू शकत नाही. वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल.
10 वर्षांपेक्षा कमी सेवा: जर तुमची नोकरी 10 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही पेन्शनची रक्कम एकरकमी काढू शकता.









