Yumnam Khemchand Singh : गेल्या दोन वर्षांपासून जातीय हिंसाचाराने होरपळत असलेल्या मणिपूर (Manipur) राज्याला अखेर नवे नेतृत्व मिळणार आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात येत असून, भाजपा नेते युमनाम खेमचंद सिंह (Yumnam Khemchand Singh) हे मणिपूरचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
मणिपूरमधील भाजपा आमदारांनी युमनाम खेमचंद सिंह यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड केली आहे. मंगळवारी झालेल्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय निरीक्षक तरुण चुग, संबित पात्रा तसेच मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. गेल्या सुमारे एका वर्षापासून राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असून, ती १२ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
कोण आहेत युमनाम खेमचंद सिंह?
युमनाम खेमचंद सिंह हे मणिपूरमधील भाजपाचे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते मानले जातात. ते दोन वेळा आमदार राहिले असून, २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सिंगजामेई विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.
मार्च २०१७ मध्ये युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूर विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. २०२२ पर्यंत त्यांनी पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. राजकीयदृष्ट्या संवेदनशील काळात विधानसभेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल त्यांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ उल्लेखनीय ठरला.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्या बिरेन सिंह सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्यात आले. नगर प्रशासन, गृहनिर्माण व शहरी विकास, ग्रामीण विकास व पंचायती राज तसेच शिक्षण ही महत्त्वाची खाती त्यांच्या जबाबदारीत होती. युमनाम खेमचंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये स्थैर्य येईल का आणि हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता प्रस्थापित होईल का, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.









