Home / महाराष्ट्र / Rahul gandhi : लोकसभेत राहुल गांधींविरुद्ध मोदी सरकार खडाजंगी ! नरवणेंचे पुस्तक दाखवताच भाजपाने सहा पुस्तके काढली

Rahul gandhi : लोकसभेत राहुल गांधींविरुद्ध मोदी सरकार खडाजंगी ! नरवणेंचे पुस्तक दाखवताच भाजपाने सहा पुस्तके काढली

Loksabha : राजधानी दिल्लीत सुरू असलेले संसदीय अधिवेशन रोज गंभीर आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi)...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Loksabha : राजधानी दिल्लीत सुरू असलेले संसदीय अधिवेशन रोज गंभीर आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi) विरुद्ध मोदी सरकार अशी खडाजंगी सभागृहात घडत असून, त्याचे पडसादच आता दिल्लीच्या रस्त्यांवर दिसू लागले आहेत. राहुल गांधी यांनी लोकसभेत (Loksabha) बोलताना माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी लिहिलेले ‘फोन स्टार्स ऑफ डेस्टीनी’ या पुस्तकातील परिच्छेद वाचून दाखवत मोदी सरकारने चीनच्या हल्ल्यावेळी कोणताही निर्णय घेतला नाही, असा गंभीर आरोप केला. आजही राहुल गांधी यांनी तेच पुस्तक संसेदत आणायचा प्रयत्न केल्यानंतर भाजपाने पूर्ण तयारीनिशी हल्लाबोल करत गांधी घराणे आणि काँग्रेसची सत्ता याबाबत गंभीर आरोप करणारी सहा पुस्तके लोकसभेत आणली आणि ती पुस्तके वाचून दाखविण्याची परवानगी मागितली. यामुळे प्रचंड गदारोळ झाला. त्यातच राहुल गांधी यांनी संसदेच्या पायर्‍यांवर केंद्रीय मंत्री रवणीत बिट्टू यांना देशद्रोही म्हटले. यानंतर भाजपाने लगेचच शीख समुदायाला एकत्र करून काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयावर थेट मोर्चाच काढला.


काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा दाखला देत आरोप केला की, लडाख सीमेवरून चिनी सैन्य आत घुसण्याचा प्रयत्न करीत होते अशावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा या सर्वांना त्यांनी संपर्क साधला आणि कोणती कारवाई करायची याबाबत मार्गदर्शन मागितले. मात्र अनेक तास उलटले तरीही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. अखेरीस राजनाथ सिंह यांनी नरवणे यांना तुमच्या जबाबदारीने तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या, असे सांगितले आणि निर्णय घेण्याचे टाळले. या क्षणाला मला अतिशय एकटे वाटले असे नरवणे यांनी लिहिले आहे. राहुल गांधी यांनी हा परिच्छेद वाचून दाखविल्याने लोकसभेत वातावरण तापले. गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांनी हे पुस्तक वाचण्यास कडाडून विरोध केला. या पुस्तकाचे अद्यापही प्रकाशन झाले नसल्याने यातील भाग लोकसभेत वाचता येणार नाही, अशी त्यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या पुस्तकातील परिच्छेद वाचण्यास राहुल गांधी यांना मनाई केली. काल याच गदारोळात अधिवेशनाचे कामकाज संपले.
 

आज सकाळी राहुल गांधी या पुस्तकाची छापील प्रत घेऊनच संसदेच्या आवारात आले. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हे पुस्तक छापलेले नाही असे म्हणतात. मात्र हे पुस्तक छापलेले आहे. मला याबाबत माझे म्हणणे सभागृहात मांडू दिले जात नाही. मला प्रश्‍न विचारण्यास मनाई केली जाते. संसदेत याच पुस्तकावरून आजही गदारोळ झाला. प्रियंका गांधी यांनी संसदेबाहेर आव्हानात्मक भाषा करीत म्हटले की, त्यांनी आम्हाला बोलू दिले नाही तर आम्हीही त्यांना बोलू देणार नाही. यानंतर भाजपाने रणनिती आखून राहुल गांधी आणि काँग्रेसवर जबरदस्त हल्लाबोल केला. भाजपाचे नेते निशिकांत दुबे यांनी सभागृहात ‘बोफोर्स गेट’ हे पुस्तक आणले आणि त्यातील परिच्छेद वाचण्यास सुरुवात केली. यावर काँग्रेसने कडाडून विरोध केला आणि सभागृहात प्रचंड हंगामा झाला. याच स्थितीत सभागृहाचे कामकाज स्थगित झाले. यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि निशिकांत दुबे यांची संसद भवनात बैठक झाली.


त्यानंतर निशिकांत दुबे यांनी सभागृहाबाहेर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत निशिकांत दुबे म्हणाले की, राहुल गांधी हे प्रकाशित न झालेले पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण माझ्याकडे प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. ती वाचण्यास मला का मनाई केली जात आहे याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. ‘रेड सारी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. यात सोनिया गांधी यांनी दहा वर्षे काय काय केले याची सर्व माहिती आहे. आणखी एक पुस्तक आहे ज्यात 2004 ते 2014 या दरम्यान काँग्रेस सरकारने पूर्ण बँकिंग व्यवस्था कशी खलास केली याची माहिती आहे. त्यावेळी बँकिंग व्यवस्था इतकी अडचणीत होती की, जागतिक बँक भारताला कर्ज देण्यासही तयार नव्हती. ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर’ या पुस्तकात मनमोहन सिंग हे केवळ नावापुरते पंतप्रधान होते आणि त्यांच्या मुखवट्यामागे गांधी परिवार देश कसा लुटत होता याची माहिती आहे.

एका पुस्तकात इंदिरा गांधी या रशियाच्या केजीबी या गुप्तहेर खात्याच्या हाती कशा शरण गेल्या होत्या आणि त्यांना आणिबाणीत भ्रष्टाचार कसा केला याची माहिती आहे. शशी थरूर यांनी लिहिलेल्या पुस्तकात गांधी, नेहरू यांच्या बाबतीत खळबळजनक माहिती दिली आहे. ‘दरबार’ या पुस्तकात इंदिरा गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सर्वांनी कसा कसा भ्रष्टाचार केला याची माहिती आहे. इंदिरा गांधी यांच्या अनैतिक संबंधांबद्दल हे पुस्तक आहे. ‘इंडियाज फर्स्ट डिक्टेटरशिप’ या पुस्तकात आणिबाणी आणि राष्ट्रपती राजवटीतील गैरप्रकाराची माहिती दिली आहे, ‘इंडियन समर’ या पुस्तकात माऊंटबॅटन यांनी भारत-पाक फाळणी कशी केली आणि त्यात कोणते राजकारण झाले याची माहिती आहे. या सर्व पुस्तकांचे वाचन मला सभागृहात करायचे आहे आणि मला ते करू दिले जात नाही. ही सर्व पुस्तके प्रकाशित असून, त्याचे लेखक हे नामांकित  व्यक्ती, पत्रकार व मंत्री आहेत.


राहुल गांधी हे नरवणे लिखित ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकातील परिच्छेद वाचून चीन आक्रमणावेळी मोदी सरकार कसे निष्क्रिय बसून राहिले हे सभागृहात सांगण्याचा प्रयत्न करीत होते तर भाजपाचे निशिकांत दुबे यांनी गांधी परिवारावरच झालेले भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या आरोपांची माहिती देण्याची मागणी सभागृहात केली. हे दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने गेले काही दिवस सभागृहाचे कामकाज होत नसून उद्याही सभागृह चालण्याची शक्यता नाही.


दरम्यान, राहुल गांधी यांनी आज संसदेच्या पायर्‍यांवर आंदोलन सुरू असताना केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांना देशद्रोही म्हटले. भाजपाने हा मुद्दा उचलत राहुल गांधी हे शीखविरोधी असल्याचा दावा केला. भाजपाचे शीख परराष्ट्रमंत्री पुरी यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर हल्लाबोल केला. त्यानंतर काही तासांतच कार्यकर्ते आणि नेते दिल्लीच्या अकबर रोडवरील येथील काँग्रेस मुख्यालयाबाहेर जमले. त्यांच्या हातात राहुल गांधींचा धिक्कार करणारे फलक होते. त्यांनी काँग्रेस मुख्यालयाबाहेर घोषणा देत आंदोलन केेले.

भारत-अमेरिका कराराबाबत
पियुष गोयल यांचे निवेदन

अमेरिकेसोबतचा करार ऐतिहासिक असल्याचा दावा करत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शेतकर्‍यांच्या हिताला यातून कोणतीही बाधा पोहोचणार नाही असे स्पष्ट केले. मात्र विरोधकांनी काहीही ऐकून न घेता जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले.


संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी दुपारी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी लोकसभेत भारत आणि अमेरिका यांच्यातील करारावर निवेदन केले. त्यांनी हा ऐतिहासिक करार असल्याचे सांगत यामध्ये भारताने कृषी आणि खाद्य क्षेत्राचा पुरेपूर विचार केल्याचा दावा केला. भारताच्या विकासामध्ये हा करार अतिशय फायदेशीर ठरणार आहे. याचा शेतकर्‍याच्या हिताला कोणताही धोका नाही. देशाच्या संवेदनशील मुद्यांबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. या व्यापार करारामुळे भारताला मोठे प्रवेशद्वार खुले झाले असून, दोन्ही देशांच्या संबंधातील हा महत्त्वाचा टप्पा आहे असे स्पष्ट केले. मात्र विरोधकांनी सभागृहात हंगामा करत त्याकडे लक्षच दिले नाही.


पियुष गोयल यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘विरोधी पक्षनेत्यांना बोलू द्या’ म्हणून आग्रह धरला. ‘नरेंद्र मोदी – सरेंडर मोदी’, ‘डरता है डरता है नरेंद्र मोदी डरता है’ अशी घोषणाबाजी सुरू केली. विरोधी खासदारांच्या घोषणाबाजीने लोकसभेत एकच गोंधळ झाला. लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी विनंती केल्यानंतरही खासदार आपल्या स्थानावर गेले नाही. शेवटी दुपारी 2 पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले.

—————————————————————————————————————————–हे देखील वाचा –

 १५ वर्षांपूर्वी चेक बाऊन्स ! राजपाल यादव अडचणीत; ४ वाजेपर्यंत आत्मसमर्पणाचे आदेश

 सोन्याने भरलेली बॅग मिळूनही प्रामाणिकपणा कायम; सफाई कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकतेला रजनीकांत यांचा सलाम

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या