Ranthambore Mobile Ban : राजस्थानमधील वन्यजीव संवर्धन आणि नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील रणथंभोरसह सर्वच प्रमुख व्याघ्र प्रकल्पांमध्ये आता पर्यटकांना मोबाइल फोन वापरण्यावर आणि चित्रीकरण करण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. वन्यजीवांच्या नैसर्गिक जीवनशैलीत मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत वन विभागाने हे पाऊल उचलले आहे.
राजस्थानमधील व्याघ्र प्रकल्पांत ‘नो मोबाइल झोन’ जाहीर-
राजस्थानच्या वन विभागाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, आता सफारीदरम्यान पर्यटक, मार्गदर्शक (गाईड्स) आणि वाहन चालकांना आपल्यासोबत मोबाइल फोन नेता येणार नाही. जंगलात रील बनवणे, सेल्फी काढणे किंवा प्राण्यांच्या जवळ जाऊन व्हिडिओ तयार करणे यांसारख्या कृत्यांमुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक वर्तनात अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, कोअर टुरिझम झोन आणि सफारी मार्गांवर मोबाइल वापराला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
वन्यजीवांचे संरक्षण आणि शांततेचा भंग रोखण्यासाठी निर्णय-
वन अधिकाऱ्यांनी या निर्णयामागील तांत्रिक आणि पर्यावरणीय कारणे स्पष्ट केली आहेत. अनेकदा पर्यटक वन्यजीवांना जवळून टिपण्याच्या हव्यासापोटी त्यांच्या अत्यंत जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. तसेच, एखाद्या ठिकाणी वाघ किंवा अन्य हिंस्र प्राणी दिसल्यास मोबाइलवरून संपर्क साधून अनेक सफारी गाड्या एकाच ठिकाणी जमा होतात. यामुळे जंगलातील शांतता भंग पावून प्राण्यांवर प्रचंड ताण निर्माण होतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि निसर्गाचे मूळ रूप जपण्यासाठी ‘शांतता क्षेत्र’ राखणे अनिवार्य झाले होते.
या व्याघ्र प्रकल्पांमध्ये नियम लागू-
राजस्थानमधील सध्या कार्यान्वित असलेल्या खालील चारही प्रमुख व्याघ्र प्रकल्पांमध्ये हे नियम तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत-
१) रणथंभोर (सवाई माधोपूर): राज्यातील सर्वांत प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प.
२) सरिस्का (अलवर): ऐतिहासिक आणि नैसर्गिक विविधतेने नटलेले क्षेत्र.
३) मुकुंदरा हिल्स (कोटा): वाघांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे केंद्र.
४) रामगड विषधारी (बुंदी): नव्याने विकसित झालेले व्याघ्र संवर्धन क्षेत्र.
धौलपूर–करौली आणि कुंभलगड येथेही नवीन व्याघ्र प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरू असून, तिथेही भविष्यात याच नियमावलीचे पालन केले जाईल.
जनजागृती आणि अंमलबजावणी-
या नवीन नियमांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्याघ्र प्रकल्प परिसरातील मुख्य प्रवेशद्वारांवर आणि विश्रामगृहांपाशी पोस्टर तसेच फ्लेक्स लावण्यात आले आहेत. पर्यटकांसोबत असणाऱ्या मार्गदर्शकांना आणि चालकांना ही विशेष सूचना देण्यात आली आहे की, त्यांनी सफारी सुरू होण्यापूर्वीच पर्यटकांना या बंदीबाबत अवगत करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही वन विभागाने दिले आहेत.









