Bhooth Bangla Release Date: बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार पुन्हा एकदा हॉरर कॉमेडीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी तब्बल १४ वर्षांनंतर ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. आधी हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार होता, मात्र आता निर्मात्यांनी चाहत्यांना सुखद धक्का देत प्रदर्शनाची तारीख बदलली असून चित्रपट आता नियोजित वेळेच्या आधीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर
निर्मात्यांनी सोशल मीडियाद्वारे एक विशेष व्हिडिओ शेअर केला. अक्षय कुमारने आपल्या अधिकृत अकाउंटवर एक टीझर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एक काळी मांजर कॅलेंडरवरील १० एप्रिल या तारखेला स्पर्श करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की, “भूत बंगलाचा काउंटडाउन रिव्हाइंड! १५ मे नाही, तर आता १० एप्रिलला चित्रपटगृहात भेटूया.”
तारीख बदलण्याचे कारण काय?
निर्मात्यांनी दिलेल्या अधिकृत पत्रकानुसार, बॉक्स ऑफिसवर इतर मोठ्या चित्रपटांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २०२६ मध्ये अक्षय कुमारचे ‘वेलकम टू द जंगल’, ‘हेरा फेरी 3’ आणि ‘हैवान’ असे अनेक चित्रपट रांगेत आहेत. त्यामुळे प्रत्येक चित्रपटाला पुरेसा वेळ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे.
बड्या कलाकारांची मांदियाळी
बालाजी मोशन पिक्चर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. एकता कपूरनेदेखील या जोडीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत तब्बल १४ वर्षांनंतर तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय परेश रावल, राजपाल यादव, असरानी, जिशू सेनगुप्ता आणि वामिका गब्बी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थान, जयपूर आणि हैदराबाद येथे झाले असून मागील वर्षी मे महिन्यात शुटिंग पूर्ण झाले होते. आता १० एप्रिल रोजी हा ‘भूत बंगला’ प्रेक्षकांसाठी दरवाजे उघडणार आहे.









