Home / लेख / Anke Gowda: एका साखर कारखाना कामगाराचा अद्भुत प्रवास! तब्बल 20 लाख पुस्तकांचे साठवले ‘धन’

Anke Gowda: एका साखर कारखाना कामगाराचा अद्भुत प्रवास! तब्बल 20 लाख पुस्तकांचे साठवले ‘धन’

Anke Gowda: एका सामान्य साखर कारखान्यात टाइमकीपर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे काय असू शकते? असा प्रश्न कोणालाही पडेल. पण कर्नाटकातील...

By: Team Navakal
Anke Gowda
Social + WhatsApp CTA

Anke Gowda: एका सामान्य साखर कारखान्यात टाइमकीपर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे काय असू शकते? असा प्रश्न कोणालाही पडेल. पण कर्नाटकातील ७९ वर्षांच्या अंके गौडा यांनी गेल्या ५ दशकांत २० लाख पुस्तकांचे अफाट साम्राज्य उभे केले आहे. त्यांच्या या ज्ञानाच्या प्रसारासाठी आणि साहित्याप्रती असलेल्या निष्ठेसाठी केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या नागरी सन्मानाने गौरवल्यामुळे सध्या त्यांचे कौतुक होत आहे.

शेतकरी कुटुंबातून पद्मश्रीपर्यंतचा प्रवास

मांड्या जिल्ह्यातील पांडवपुरा येथील रहिवासी असलेले अंके गौडा एका शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झाले. लहानपणी वाचायला पुस्तके मिळणे ही त्यांच्यासाठी चैन होती. अभ्यासाची ओढ आणि पुस्तकांचे कुतूहल त्यांना स्वस्थ बसू देईना. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बस कंडक्टर म्हणून नोकरी पत्करली, मात्र एका शिक्षकाच्या आग्रहाखातर त्यांनी पुन्हा पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि साखर कारखान्यात रुजू झाले.

पगाराचा मोठा हिस्सा पुस्तकांवर खर्च

अंके गौडा यांच्या आवडीची गोष्ट म्हणजे, ते आपल्या मासिक पगाराचा २/३ भाग केवळ पुस्तके खरेदी करण्यासाठी वापरत असत. उर्वरित पैशात ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत. इतकेच नाही, तर जास्तीचे पैसे कमावण्यासाठी त्यांनी गाई पाळल्या, दूध विकले आणि विमा एजंट म्हणूनही काम केले. या मेहनतीतून त्यांनी बायबलच्या दुर्मिळ प्रतींपासून ते प्रत्येक विषयावरील लाखो पुस्तकांचा संग्रह केला आहे.

ग्रंथपालाशिवाय चालणारे अनोखे वाचनालय

गौडा यांचे वाचनालय १५,८०० चौरस फूट परिसरात पसरलेले आहे. येथे कोणताही अधिकृत ग्रंथपाल नाही. पुस्तके कपाटात, जमिनीवर आणि पोत्यांमध्ये काहीशी विस्कळीत वाटू शकतात, पण गौडा यांना कोणत्या कोपऱ्यात कोणते पुस्तक आहे, याची अचूक माहिती असते. आजही सुमारे ८ लाख पुस्तके उघडायची बाकी आहेत. हे वाचनालय आठवड्याचे ७ दिवस आणि १२ महिने लोकांसाठी खुले असते.

पुढील पिढीला आवाहन

आता उतारवयामुळे अंके गौडा यांना थकवा जाणवू लागला आहे. “मी माझी जबाबदारी पार पाडली आहे, आता हे ज्ञानभांडार पुढे नेण्याची जबाबदारी सरकार आणि जनतेची आहे,” असे भावूक उद्गार त्यांनी काढले आहेत. आज हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि पुस्तक प्रेमी त्यांच्या या ज्ञानाच्या महासागराचा लाभ घेत आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या