ST New Bus Service: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच एक मोठी भर पडणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने ३ बाय २ आसन व्यवस्था असलेल्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी केल्या आहेत. या नवीन बससेवेला ‘राजमाता जिजाऊ’ असे नाव देण्यात आले असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना मिळणार दिलासा
सध्या एसटीच्या ताफ्यातील बहुतांश बसची आसन क्षमता ४० इतकी आहे. मात्र, नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसून प्रवास करू शकतील. यामुळे अतिगर्दीच्या मार्गांवर उभे राहून प्रवास करणाऱ्या अतिरिक्त १५ प्रवाशांना आता बसण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. दोन शहरांमधील मुख्य मार्गांवर ही सेवा प्राधान्याने सुरू करण्याचा महामंडळाचा विचार आहे.
नावाचा गौरवशाली वारसा
यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेच्या प्रेरणास्थान असलेल्या राजमाता जिजाऊ साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून या बसचे नामकरण करण्यात आले आहे.” एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई आणि हिरकणी यांसारख्या ऐतिहासिक नावांनी आपल्या गाड्यांना ओळख दिली आहे. आता या यादीत ‘राजमाता जिजाऊ’ या मानाच्या नावाचा समावेश झाला आहे.
भगवा आणि शुभ्र रंगाची आकर्षक रंगसंगती
या नवीन बस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतील. या बस भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत तयार करण्यात आल्या असून त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवतील. केवळ नावच नाही, तर आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या बस प्रवाशांच्या सेवेसाठी कटीबद्ध राहतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मार्च महिन्यापासून प्रवाशांना या नवीन आणि आरामदायी बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.









